गांधी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 05:54 PM2020-01-15T17:54:04+5:302020-01-15T17:54:12+5:30
मनसुख मांडवीय : मोझरी येथून गांधी संकल्प पदयात्रेचा शुभारंभ
गुरुकुंज मोझरी (अमरावती) : महात्मा गांधी यांच्या विचारांची ताकद नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी संकल्प पदयात्रा मोलाची ठरेल, असे केंद्रीय जहाज बांधणी, रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज येथे सांगितले.
गुरुकुंज मोझरी येथे ‘राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता - मोझरी ते सेवाग्राम गांधी संकल्प पदयात्रा’चा शुभारंभ ना. मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार विकास महात्मे या पदयात्रेचे आयोजक आहेत. त्यांच्यासह आमदार रवि राणा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष सुरेखा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख, पंचायत समिती उपसभापती शरद वानखडे, मोझरीचे सरपंच बबलू मक्रमपुरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष महात्मे, श्रीगुरुदेव सेवाश्रमचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल, बालाजी पवार, रघुनाथ वाडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
देशाला ग्रामगीतेतून ग्रामस्वराज्याचा संदेश देणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भूमीतून गांधी विचारांचा प्रसार करण्यासाठी पदयात्रा सुरू होत आहे. गाव समृद्ध होईल, तर राष्ट्र समृद्ध होईल. स्वच्छता, शिक्षण, स्वावलंबन याबाबत गांधीजींनी दिलेली शिकवण आजही पथदर्शक आहे. ही शिकवण तरुणाईच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. या कार्यात पदयात्रेचा उपक्रम मोलाचा ठरेल. गांधी विचारांच्या प्रसारासाठी आपण यापूर्वी पदयात्रा आयोजित केल्यात. त्यातून प्रेरणा मिळून अनेक मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्यात. आज त्या भगिणी मोठ्या पदावर कार्यरत आहेत. पदयात्रेसह अनेक विधायक उपक्रमात योगदान देत आहेत, असे ना. माडविय म्हणाले.
महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या तत्त्वांपासून प्रेरणा घेऊन ही पदयात्रा आयोजित केल्याचे खासदार विकास महात्मे म्हणाले. सुरेखा ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी ना. मांडवीय यांच्यासह सर्वांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. राज्याच्या विविध भागांतून तसेच राज्याबाहेरून या यात्रेत सुमारे दोन हजार कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
सेवाग्राम येथे समारोप
मोझरी येथून गांधी संकल्प यात्रेला प्रारंभ झाला. ही यात्रा अनकवाडी, मालधूर, वºहा, घोटा, मारडा, जहागीरपूर, बोर्डा, अंजनसिंगी, पिंपळखुटा, चिंचपूर, शिदोडी, पेठ रघुनाथपूर, मंगरूळ दस्तगीर, बोरगाव फाटा, झाडा, तिगाव, रोठा मार्गे सेवाग्रामला पोहोचेल. १९ जानेवारीला सकाळी १० वाजता संकल्प यात्रेचा समारोपीय कार्यक्रम होईल.