विदर्भातील वाघांची बदली, अधिवासांचेही होणार संशोधन
By गणेश वासनिक | Published: April 8, 2023 05:20 PM2023-04-08T17:20:56+5:302023-04-08T17:21:45+5:30
ब्रह्मपुरीचे पाच वाघ हलविणार; केंद्र सरकारचा पुढाकार, व्याघ्र प्रकल्पांबाहेर वाघांचा कॉरिडोर चिंताजनक
अमरावती : विदर्भात वाघांची संख्या वाढली असताना त्यांचे स्थलांतर, अधिवासांची समस्या उद्भवली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वाघांना अधिवासासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे विदर्भातील पाच वाघांची बदली होणार असून, केंद्र सरकारने वाघांच्या अधिवास संदर्भात संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर येत्या काळात सुरक्षितस्थळी वाघांचा मुक्काम असणार आहे.
केंद्र सरकारच्या अधिनस्थ राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने वाघांची संख्या वाढली ही बाब आनंददायी आहे. तथापि, व्याघ्र प्रकल्पांबाहेर वाघांचा अधिवास हा धोकादायक ठरत आहे. त्यामुळे ज्या व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या ‘ओव्हरफ्लो’ झाली, अशा ठिकाणाहून वाघ अन्य सुरक्षितस्थळी पाठविण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार जागतिक व्याघ्र संघटनेने संमती दर्शविल्याची माहिती आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचे स्थलांतर ही गंभीर समस्या आहे. विशेषत: ब्रह्मपुरी परिसरातील वाघ वणी, यवतमाळ, गडचिरोली, उमरेडपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे मानव- वन्यजीव संघर्ष वाढत असल्याचे चित्र आहे. ब्रह्मपुरी बफर झोन भागात काही वाघ ‘मॅन ईटर’ झाल्यामुळे अशा वाघांची दुसरीकडे बदली केली जात आहे. ब्रह्मपुरीच्या वाघांसाठी नवेगाव- नागझिरा हे ठिकाण सुरक्षित असल्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात २५० ते २७५ वाघ
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून ३८५ वाघ असल्याची नोंद आहे. मात्र, एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात २५० ते २७५ वाघ असल्याची माहिती आहे. ब्रह्मपुरी, वरोरा, भद्रावती या भागातील वाघांचे स्थलांतरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरी वस्त्यांमध्ये वाघ धुमाकूळ घालत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
केंद्र सरकारची चमू पाहणी करणार
वाघांचे स्थलांतर करण्यापूर्वी वाघांचा अभ्यास केला जाणार आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या शिफारशीअंती केंद्राची चमू व्याघ्र प्रकल्पात येईल. वाघांची ओळख, जन्म, वय, वातावरण, तृणभक्षी प्राणी, खाद्य, अधिवास, दोन जंगलातील अंतर, वृक्ष, वन्यजीव, प्रजाती आदींचा अभ्यास केल्यानंतर ही चमू एनटीसीएला वाघांच्या स्थलांतराबाबत अहवाल देईल.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या गाईडलाईननुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी या बफर झोन भागातील पाच वाघ हे नवेगाव बांध-नागझिरा येथे पाठविले जाणार आहे. ब्रह्मपुरी भागात वाघांची संख्या वाढल्याचा अहवाल वनविभागाने दिला आहे. त्यानुसार पुढील प्रक्रिया राबविली जाईल.
- सुधीर मुनगंटीवार, वने सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र