परिवहन विभाग गतिमान करणार
By Admin | Published: April 19, 2016 12:04 AM2016-04-19T00:04:54+5:302016-04-19T00:04:54+5:30
राज्यातील ८० टक्के सर्वसामान्य जनता ही एसटी बसने प्रवास करते. प्रवाशांना आराम दायक व सुरक्षीत प्रवास करता यावा,...
दिवाकर रावते : राजापेठ बसस्थानकाचे लोकार्पण
अमरावती : राज्यातील ८० टक्के सर्वसामान्य जनता ही एसटी बसने प्रवास करते. प्रवाशांना आराम दायक व सुरक्षीत प्रवास करता यावा, यासाठी सर्व सोयी-सुविधायुक्त बस स्थानकांच्या निर्मितीसोबतच परिवहन विभाग अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी केले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाव्दारे उभारण्यात आलेल्या राजापेठ बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पणप्रंसगी रावते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, श्रीकांत देशपांडे, रवि राणा, माजी आमदार संजय बंड, प्रशांत वानखडे, महापौर चरणजितकौर नंदा, नगरसेवक सुनील राऊत, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, एस.टी. महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक मधुकर पठारे, विभाग नियंत्रक राजेश अडोकार, विभागीय वाहतुक अधिकारी सिया, आगार क्र.१ चे व्यवस्थापक मनोहर धजेकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना रावते म्हणाले, विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आवश्यक ती तरतूद शासनाव्दारे करण्यात येईल. कुठल्याही स्थितीत बीओटी तत्त्वावर एसटी महामंडळाची जागा व्यावसायिक वापरासाठी देण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अधिक गतिमान व सक्षम करण्यासाठी शासनाने भांडवली खर्च म्हणून सुमारे १२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या पैशाच्या माध्यमातून एसटी विभागाचा महत्त्वाच्या मूलभूत बाबींसाठी उपयोग करून कायापालट करण्यात येणार आहे. एसटी बसने प्रवास करताना अपघात झाल्यास शासनाकडून प्रवाशास तत्काळ मदत म्हणून १० लाखांचा विमा देण्यात येणार आहे. तसेच चालक - वाहकांना अपघात झाल्यास त्यांचा वारसांना १० लाख रुपयाचा विमा निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे रावते यांनी सांगितले. आ. सुनील देशमुख, आ. रवि राणा यांचीसुध्दा मार्गदर्शनपर समायोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक व्यवस्थापक मधुकर पठारे, तर सूत्रसंचालन ज्योती तोटेवार व आभार विभाग नियंत्रक राजेश अडोकार यांनी मानले. यावेळी उपयंत्र अभियंता अविनाश राजगुरे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खांडेकर, प्रादेशिक अभियंता मानिक राठोड, परिवहन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच एस.टी. महामंडळ कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मिनीबस सेवा सुरू करण्याची पोटेंची सूचना
परिवहन विभागाच्या ज्या चालक-वाहक कर्मचाऱ्यांनी किरकोळ अपहार केला अशा सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीत सामावून घेण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय मंत्र्यांनी घेतला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना फार मोठा धीर मिळाला आहे. एसटी विभागाने ग्रामीण भागातील गोर-गरीब व मजुरांच्या मुलांना शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येणे सोईचे व्हावे यासाठी ३० आसनी मिनीबस सुरू कराव्यात तसेच सर्व सामांन्यांना परवडणार अशी बससेवा परिवहन विभागाव्दारे पुरविण्यात यावी, अशी सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी महामंडळाला दिल्या.