शिक्षणाची सोय नसलेल्या वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:14 AM2021-03-26T04:14:26+5:302021-03-26T04:14:26+5:30
अमरावती : ग्रामीण किंवा शहरी भागाच्या लहान वस्ती स्थानांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता वाहतूक व्यवस्था करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला ...
अमरावती : ग्रामीण किंवा शहरी भागाच्या लहान वस्ती स्थानांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता वाहतूक व्यवस्था करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील एकूण ३ हजार ७३ वस्त्यांमधील १६,३३४ विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. यात जिल्ह्यातील अमरावती, चांदूर बाजार, मोर्शी तालुक्यातील ३० शाळांचा समावेश आहे. यात चांदूर बाजार तालुक्यातील सर्वाधिक २५ शाळा आहेत.
ज्या वस्त्यांच्या जवळपास प्राथमिक शिक्षणाची सोय नाही तेथील विद्यार्थ्यांना वस्तीलगतच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी जावे लागते. मात्र, बरेचदा वाहतुकीची व्यवस्था नसल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडतो. अशा विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाऊन प्राथमिक शिक्षण घेता यावे. याकरिता आता वाहतूक भत्ता किंवा वाहतूक सुविधा पुरविण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले असून राज्यभरातील ३ हजार ७३ वस्तीस्थाने निश्चित केली आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पूर्वतयारी करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील अशी वस्तीस्थाने त्यांचे शाळेपासूनचे अंतर प्रत्येक वस्तीवरील लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या या सगळ्या बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत. या पात्र वस्त्या आणि विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
बॉक्स
वस्ती नजीक शाळेची अनुपलब्धता
आवश्यक माध्यमांची शाळा नसणे
अत्यंत मागास गरीब घटकातील विद्यार्थी असणे
शाळेचे अंतर फार असणे