मालखेड येथे देशी दारूची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:11 AM2021-04-19T04:11:48+5:302021-04-19T04:11:48+5:30
१ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटकेत चांदूर रेल्वे : तालुक्यातील मालखेड (रेल्वे) येथे विनापरवाना अवैधरीत्या देशी ...
१ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटकेत
चांदूर रेल्वे : तालुक्यातील मालखेड (रेल्वे) येथे विनापरवाना अवैधरीत्या देशी दारू वाहतूक करताना चौघांना पकडले. तेथून १ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चांदूर रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी रात्री ११.१५ ते १ च्या सुमारास केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव व ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती चांदूर रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर मालखेड येथे धाड घातली असता, विनापरवाना एकूण ७ हजार ४८८ रुपयांचे देशी दारूचे १८० मिलीचे १४४ नग असा मुद्देमाल, सव्वा लाखाच्या दुचाकीसह अन्य दुचाकी (एमएच ३७ पी ९६१८) असा एकूण १ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणात आरोपी श्रीकृष्ण ज्ञानेश्वर देवडे (३९), शेख फिरोज रहिम कनोजिया (३६), गजानन रामाजी मोरकार (मोरे) (३८), सतीश लक्ष्मणराव चौधरी (३४, सर्व रा. कवठा कडू) यांना अटक करण्यात आली.
देशी दारू कुठून आणली, याबाबत नमूद आरोपींना पोलिसांनी विचारपूस केली असता, आरोपींनी मालखेड (रेल्वे) ग्रामपंचायतसमोरील देशी दारूच्या दुकानातून हा मुद्देमाल घेतल्याचे सांगितले. त्यामुळे नमूद आरोपीवर कलम ६५-ई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाचा गुन्हा दाखल केला. यात भादंविचे कलम १८८ ची वाढ करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे, नायक पोलीस कॉन्स्टेबल सुधीर जुमडे, योगेश कडू, देवतळे, शिपाई पवन यांनी केली. आरोपींची अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.