तळणी येथील लाचखोर तलाठी एसीबीकडून ‘ट्रॅप’
By प्रदीप भाकरे | Published: July 8, 2024 06:30 PM2024-07-08T18:30:45+5:302024-07-08T18:31:16+5:30
शेतीचा फेरफार करण्यासाठी घेतली १५०० रुपयांची लाच : तहसीलमध्ये रंगेहाथ अटक
अमरावती : शेतीचा फेरफार लवकरात लवकर करून देण्यासाठी १ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तळणी येथील तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई सोमवार, ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास धामणगाव रेल्वे येथील तहसील कार्यालय परिसरात करण्यात आली. प्रफुल्ल पांडुरंग थोरात (४४) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदार असलेल्या एका व्यक्तीच्या सासऱ्यांनी मौजा तळणी येथील १ हेक्टर ६२ आर शेती ८ लाख ३० हजार रुपयांमध्ये खरेदी केली होती. त्या शेतीचा तक्रारदाराच्या सासऱ्यांच्या नावाने फेरफार करण्यासाठी तलाठी प्रफुल्ल थोरात याने तक्रारदाराला ४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली. पडताळणीत तलाठी प्रफुल्ल थोरात याने शेतीचा फेरफार लवकरात लवकर करून देण्यासाठी तडजोडीअंती १ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार, सोमवारी दुपारी सापळा रचण्यात आला. तहसील कार्यालय परिसरात तक्रारदाराकडून लाचेचे १ हजार ५०० रुपये स्वीकारताच तलाठी प्रफुल्ल थोरात याला दबा धरून बसलेल्या पथकाने रंगेहात अटक केली. त्याच्याविरुद्ध दत्तापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक मारूती जगताप यांच्या नेतृत्वात पोलीस उपअधीक्षक मंगेश मोहोड, पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, प्रमोद रायपुरे, शैलेश कडू, नितेश राठोड, चंद्रकांत जनबंधू यांनी केली.