चिखलदऱ्याच्या वनउद्यानात कचऱ्यांचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:03 PM2018-02-05T22:03:27+5:302018-02-05T22:03:51+5:30

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील वनविभागाच्या एकमेव उद्यानावर लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ ठरत असल्याचे चित्र आहे.

Trash pile in a mud forest | चिखलदऱ्याच्या वनउद्यानात कचऱ्यांचे ढीग

चिखलदऱ्याच्या वनउद्यानात कचऱ्यांचे ढीग

Next
ठळक मुद्देपर्यटकांमध्ये संताप : संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमत
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील वनविभागाच्या एकमेव उद्यानावर लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ ठरत असल्याचे चित्र आहे. मोकाट कुत्र्यांचा वावर, ठिकठिकाणी पडलेला कचरा, माकडांच्या मर्कटलीला पर्यटकांना नाउमेद करीत असल्याने याबाबत संताप व्यक्त होत आहे.
पूर्व मेळघाट वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या येथील अप्पर प्लेटो स्थित वनउद्यानाला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. चिखलदरा पर्यटनस्थळावर वर्षभरात दीड लाखांवर पर्यटक हजेरी लावतात. या उद्यानालाही मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. मात्र, येथे घोर निराशा होत असल्याचे मत पर्यटकांनी व्यक्त केले आहे.
शासनाच्या नोव्हेंबर २०११ च्या निर्णयानुसार, खटकाली येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला वनउद्यानाच्या देखभालीकरिता पर्यटकांकडून प्रत्येकी पाच रुपये आकारण्याची मुभा देण्यात आली आहे. वनउद्यानाची देखरेख, स्वच्छता हे समितीचेच कार्य आहे. मात्र येथे पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे. समितीच्या आर्थिक व्यवहारातसुद्धा मोठ्या प्रमाणात वैयक्तिक हित साधले जात असल्याची माहिती पुढे येऊ लागली आहे. परिणामी वनउद्यान वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.
स्विमिंग टँकमध्ये दुर्गंधी
येथील उद्यानात वीस वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला तरणताल अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळानंतर बेवारस पडला आहे. पर्यटकांसह स्थानिकांसाठी लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेला तरणताल काही वर्षे मंडळाने चालविण्यासाठी घेतला. मात्र, अवाढव्य वीज देयक व इतर खर्चामुळे त्यांनी करार सोडल्यापासून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी व कचरा पर्यटकांचे आरोग्य धोक्यात आणणारे ठरले आहे.
खेळणी तुटली, बाळगोपाळांची निराशा
दूरवरून येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आजमितीस असा कुठलाच प्रकल्प नाही. त्यामुळे वनउद्यानावरच पर्यटकांना समाधान मानावे लागत असताना, येथील बकाल अवघ्या निराश करणारी ठरली आहे. बालगोपालांसाठी असलेली खेळणी तुटली असून, एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर जाण्याचा ‘ट्री रूट’ (मार्ग) बांबू सडल्याने बंद करण्यात आला आहे.

खटकाली येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला वनउद्यान देखरेख, स्वच्छतेसाठी शासननिर्णयानुसार देण्यात आले आहे. आदिवासी युवक उद्यान चालवितात. तशा सूचना समितीला देण्यात येईल.
- डी.के. मुनेश्वर, वनपरिक्षेत्र अधिकारी, चिखलदरा

Web Title: Trash pile in a mud forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.