यात्रा, मंदिर बंद; ‘पंढरपूर स्पेशल’ रेल्वे यंदाही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:10 AM2021-07-19T04:10:12+5:302021-07-19T04:10:12+5:30
अमरावती : मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्यावतीने वारकऱ्यांच्या मागणीनुसार आषाढी एकादशीच्या पर्वावर अमरावती-पंढरपूर स्पेशल ट्रेन गत काही वर्षांपासून सुरू करण्यात ...
अमरावती : मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्यावतीने वारकऱ्यांच्या मागणीनुसार आषाढी एकादशीच्या पर्वावर अमरावती-पंढरपूर स्पेशल ट्रेन गत काही वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रकोपाने सलग दुसऱ्या वर्षी आषाढीत पंढरपूर रेल्वे स्पेशल धावणार नाही. यामुळे रेल्वे प्रशासनालाही लाखोंचा फटका बसला आहे.
पंढरपूर यात्रा ही विठ्ठल भक्तांसाठी पर्वणी असते. मिळेल त्या वाहनांनी वारकरी पंढरपूर गाठतात आणि विठ्ठलाचे मनोभावे दर्शन करून परत येतात. नामदेव महाराज, ज्ञानेश्वरापासून तर आजतागायत ७५० वर्षांपासून वारीची पंरपरा चालत आली आहे. यापूर्वीची प्लेगची महामारी आली. मात्र, प्रशासनामध्येच एवढी जनजागृती नसल्याने त्यावेळीही वारी अव्याहत पार पडली. तथापि, दीड वर्षांमध्ये कोरोना संसर्गाने यात्रा रद्द झाल्या आणि मंदिरांची कुलपे उघडली गेली नव्हती. यंदा पंढरपूर येथे पालख्या एसटी बसने पाठविण्यात आल्या आहेत. भक्तांची गर्दी होणार नाही, याची काळजी शासन घेत आहे. त्यामुळे यात्रा भरणार नाही. एसटी बसही पंढरपूर यात्रेच्या अनुषंगाने धावण्यास मनाई करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे रेल्वे प्रशासनाने पंढरपूर विशेष ट्रेन रद्दचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी आषाढीत अमरावती व पंढरपूर येथून प्रत्येकी चार रेल्वे गाड्या सोडण्यात येतात. यात वातानुकूलित, स्लीपर, सामान्य डबे असलेली पंढरपूर स्पेशल ट्रेन वारकऱ्यांसाठी चालविली जाते. प्रत्येक फेरीत दोन लाखांपेक्षा अधिक रेल्वेला उत्पन्न प्राप्त होतो. मात्र, पंढरपूर विशेष रेल्वे रद्द असल्याने मध्य रेल्वे भुसावळ विभागाला लाखोंचा फटका बसला आहे.
------------------
रेल्वे प्रवासाने विठुरायाचे दर्शन अल्पखर्चात
पंढरपूर येेथे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी, शेतकऱी आणि सामान्यांना रेल्वे गाडीचा प्रवासच परवडणारा आहे. सर्वसाधारण आसनाचे तिकीट ३०० रुपये आहे. रेल्वे गाडीचा सुखकर प्रवास असतो. कमी खर्चात पंढरीत विठ्ठलाचे दर्शन घेता येते. मात्र, यात्रा,मंदिर बंद असल्याने यंददेखील विरजन आले आहे.
- कैलासनाथ मोरे महाराज, वारकरी.
-----------------
रस्ते जागाेजागी उखडले आहेत. वाहनांचा प्रवास अलिकडे त्रासदायक ठरणारा आहे. त्यामुळे दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर रेल्वे गाडीने जातो. मात्र, गेल्या दोन वर्षापासून पंढरपूर यात्रेला जाता आले नाही. विठ्ठलाचे दर्शन दुर्लभ झाले आहे. यंदा तरी पंढरपूर विशेष रेल्वे सुरु होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही.
- पद्माकर किटे, विठ्ठल भक्त
--------------------
मध्य रेल्वे विभागाला आर्थिक फटका
कोरोनामुळे यंदाही पंढरपूर विशेष रेल्वे धावणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. दरवर्षी या गाडीला वारकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. चार फेऱ्यांमुळे रेल्वेला अधिक उत्पन्नही मिळते. मात्र, अमरावती- पंढरपूर विशेष रेल्वेअभावी आर्थिक फटका बसल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.