उपाशी पोट अन् अनवाणी पायाने केला प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 05:00 AM2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:01:15+5:30
पोटासाठी शेकडो किलोमीटर गेलेले आदिवासी पाठीवर बिऱ्हाड घेऊन जंगलाच्या आडमार्गाने पायपीट करीत परत येत आहेत. शिक्षितांना घरी पोहचविण्यासाठी ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केली जाते. मात्र, आदिवासींसाठी काय, हा प्रश्न कोरोनाच्या संकटकाळातही कायम आहे. २३ मार्च रोजी देश लॉकडाऊन झाला. त्यावेळी जो जिथे होता, तिथेच अडकून पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : दुपारी दीड वाजताची वेळ. अंगाची लाहीलाही करणारे उन्ह. तीन चिमुकल्यांच्या हातात चार केळी, दोन रुपयांचा बिस्किट पुडा. ११ जणांसाठी पाण्याची एकमेव बॉटल. सर्वांच्या डोक्यावर भांड्याकुंड्याचे ओझे. शंभर किलोमीटरचा प्रवास करीत उपाशीपोटी गावाकडे निघालेल्या या आदिवासींना पाहून अधिकाऱ्यांची गाडी थांबली. विचारणा झाली. नजीकच्या झाडाखाली सावलीत बसवून त्यांना पाणी पुरविले गेले. डॉक्टरांना पाचारण करून तपासणीदेखील झाली. पोटभर जेवणाची व्यवस्था केल्यावर त्यांना शासकीय वाहनाने गावापर्यंत पोहचविले गेले. मेळघाटातील सोनापूर-एकझिरा रस्त्यावर शनिवारी हे दिलासादायक चित्र अधिकाऱ्यांच्या समयसूचकतेने निदर्शनास आले.
पोटासाठी शेकडो किलोमीटर गेलेले आदिवासी पाठीवर बिऱ्हाड घेऊन जंगलाच्या आडमार्गाने पायपीट करीत परत येत आहेत. शिक्षितांना घरी पोहचविण्यासाठी ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केली जाते. मात्र, आदिवासींसाठी काय, हा प्रश्न कोरोनाच्या संकटकाळातही कायम आहे. २३ मार्च रोजी देश लॉकडाऊन झाला. त्यावेळी जो जिथे होता, तिथेच अडकून पडला. मेळघाटातूनही हजारो आदिवासी कामाच्या शोधात परराज्यासह राज्यातील बड्या शहरांमध्ये कामासाठी गेले होते. परंतु, दोन महिन्यांपासून एकाच ठिकाणी अडकल्याने गावाकडे जाण्याची ओढ लागली. जवळचे कमावलेले धन होते, ते सर्व संपले. त्यामुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करीत आदिवासी चिल्यापाल्यांसह गाव जवळ करीत आहेत. दर्यापूर येथे कामाला आलेले ११ आदिवासी तीन चिमुकल्यांसह धारणी तालुक्यातील कसाईखेडा येथे जाण्यासाठी पायी निघाले होते. त्या रस्त्याने चिखलदराचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व कर्मचारी पाणीटंचाई व टँकरचा आढावा घेण्यासाठी जात असताना हा समूह त्यांच्या दृष्टीस पडला.
आरोग्य तपासणी
धारणी तालुक्यातील कसाईखेडा येथील ते आदिवासी दर्यापूर येथे दाल मिलमध्ये कामासाठी गेले होते आणि तिथून ते पायी गावाकडे निघाले होते. त्या आदिवासींसाठी नजीकच्या टेम्ब्रुसोंडा आरोग्य केंद्राचे वाहन बोलवून त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना भोजन देण्यात आले. धारणीचे तहसीलदार अतुल पाटोळे यांच्याशी संवाद साधून कसाईखेडा येथे जाण्याची व्यवस्था करण्यात आली.
शनिवारी पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी जात असताना काही आदिवासी पायी जाताना दिसले. त्यांची विचारपूस करून आरोग्य तपासणी व जेवण देऊन त्यांना शासकीय वाहनाने गावी पाठविण्यात आले.
- प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, चिखलदरा