काळवीट ग्रामस्थांचा जमीनदोस्त पुलावरून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:33 AM2019-08-17T01:33:29+5:302019-08-17T01:33:55+5:30
अचलपूर तालुक्यातील काळवीट गावाचा संपर्क मागच्या पंचवीस वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात बिच्छन नदीच्या पुरामुळे तुटतो. असे असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आदिवासींमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील काळवीट गावाचा संपर्क मागच्या पंचवीस वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात बिच्छन नदीच्या पुरामुळे तुटतो. असे असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आदिवासींमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे. जमीनदोस्त झालेल्या पुलावर नवीन पुलाची निर्मिती करण्याची मागणी अनेक वर्षांपासून धूळखात पडली आहे. संबंधित विभागाचा कोट्यवधीचा खर्च अधिकारी, अभियंता करतात तरी कुठे, असा सवाल करण्यात आला आहे
अचलपूर तालुक्यातील निमकुंड ग्रामपंचायत अंतर्गत काळवीट गावातून वाहणाऱ्या बिच्छन नदीला प्रत्येक पावसाळ्यात पूर येतो. त्या पुरामुळे सतत आठ ते दहा दिवसा आदिवासींना ये-जा करता येत नाही. आवश्यक त्या वेळी कंबरेएवठ्या पाण्यातून नागरिक जीवघेणा प्रवास करतात. हा सर्व खटाटोप थांबण्यासाठी सरपंच अनिल आकोले यांनी ग्रामपंचायतमार्फत अनेकदा अचलपूर पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभागाला पत्रे दिली. परंतु, संबंधित विभागाचे दुर्लक्ष कायम आहे.
काळवीट या गावाची लोकसंख्या ११६० आहे. नदीच्या पुरामुळे गावाचा संपर्क जगाशी तुटत असल्यामुळे गंभीर आजारी रुग्ण, शालेय विद्यार्थी, मजूर आदी सर्वांनाच फटका बसतो. मल्हारा गावातून गोडवाडी तलाव मार्गे काळवीट गावाला जाण्याचा मार्ग आहे.
२५ वषार्पासून मतदान नाही
अचलपूर पंचायत समिती अंतर्गत निमकुंड ग्रामपंचायतीमध्ये मागील २५ वर्षांपासून सरपंच, उपसरपंच, सदस्यपदासाठी मतदान झाले नाही. गावकरी एकमताने सदस्यांना निवडून देतात. त्यामुळे आदर्श असलेल्या या गावाची व्यथा अधिकारी-पदाधिकाऱ्यांना दिसून न यावी, याबाबत मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
खा. नवनीत राणा यांना निवेदन
काळवीट गावाचा संपर्क नदीवर पूल नसल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात संपुष्टात येत असल्याचे निवेदन खासदार नवनीत राणा यांना देण्यात आले. आता या गावातील पूल निर्माण होण्याची शक्यता असून, आतापर्यंत कामात कुचराई करणाºया संबंधित विभागाच्या अधिकाºयांवर कारवाईची मागणीही आदिवासींनी निवेदनात केली आहे.