महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स पलटी; दोन जणांचा मृत्यू, तर दोघं गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 02:45 PM2022-08-16T14:45:29+5:302022-08-16T14:50:01+5:30
ट्रॅव्हल्समधील अन्य १४ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती नांदगांव पेठचे ठाणेदार प्रवीण काळे यांनी दिली.
अमरावती : नागपूरहून बुलढाणाकडे जाणाऱ्या भरधाव जाणारी ट्रॅव्हल्स उलटून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. नागपूर महामार्गावरील नांदगांव पेठनजीकच्याहॉटेल वाटिकाजवळ सोमवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ट्रॅव्हल्समधील अन्य १४ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती नांदगांव पेठचे ठाणेदार प्रवीण काळे यांनी दिली.
सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास एम एच २८ बीबी ३१३२ क्रमांकाची ट्रॅव्हल्स नागपूरहून बुलढाणाकरिता प्रवासी घेऊन निघाली. रात्री एक वाजताच्या दरम्यान हॉटेल वाटिकानजीक चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने ती ट्रॅव्हल्स दुभाजकावर कोसळली. यामध्ये राहुल विनय गुप्ता (५०, रा. साबरानगर, लुधियाना, पंजाब) व अरुण प्रल्हाद सावळे (५५, रा. नंदनवन नागपूर) हे दोघे जागीच ठार झाले. तर सीमा शुद्धोधन पाटील (३५, रा. सक्करदरा, नागपूर) व अमित सुरेश बेरोजाय (३४, रा लकडगंज, भुसावळ चौक, खामगाव) हे दोघे गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने रुग्णवाहिका पाचारण करून जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अन्य १४ प्रवाशी अन्य वाहनाने निघून गेले. सरदार सुरेंद्रसिंग कुलावंतसिंग (रा कर्नाल हरियाणा) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेल्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.