एसटीने प्रवास करताय; सॅनिटायझर घेतलाय ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:10 AM2021-06-06T04:10:06+5:302021-06-06T04:10:06+5:30
अमरावती : गतवर्षी कोरोनामुळे विस्कटलेले चक्र रुळावर येत असतानाच पुन्हा एप्रिलपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत गेली. त्याला प्रतिबंध लागावा म्हणून ...
अमरावती : गतवर्षी कोरोनामुळे विस्कटलेले चक्र रुळावर येत असतानाच पुन्हा एप्रिलपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत गेली. त्याला प्रतिबंध लागावा म्हणून कडक निर्बंध जारी करण्यात आले. अत्यावश्यक सेवेसाठी एसटी बससेवा सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे बसमधील गर्दी ओसरली. गत दीड महिन्यांपासून प्रवाशांची संख्या घटली, शिवाय फेऱ्या कमी झाल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. दीड महिन्यांत २० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महत्त्वाच्या कामांसाठी जाणाऱ्या प्रवाशांनाच एसटीत प्रवेश दिला जात आहे. गतवर्षी बसमध्ये चढलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत असे. आता मात्र सॅनिटायझर देणे बंद केले आहे. मात्र, वाहकच प्रवाशांना सॅनिटायझर हाताला लावले काय, हे विचारत आहेत. ज्येष्ठ नागरिक असतील, तर वाहक स्वत:कडील सॅनिटायझर देत आहेत. एका सीटवर एकानेच बसावे, मास्क हनुवटीवर नको, नाक-तोंड झाकेल अशा पद्धतीने लावा, असे सांगावे लागते. वास्तविक, एसटीत अन्य प्रवाशांना नाकारण्यात येत असले तरी खेडेगावातील ज्येष्ठ, वयस्क मंडळींना पर्यायी साधन नसल्याने बसमध्ये प्रवेश द्यावाच लागत आहे. गत दीड महिन्यात फेऱ्या घटल्याने एसटीचे उत्पन्न घटले. आर्थिक भुर्दंड सोसत एसटी प्रवाशांना सेवा देत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.
बॉक्स
ना मास्क, ना सॅनिटायझर
गतवर्षी एसटीत चढणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत असे. मास्क नसणाऱ्या प्रवाशाला मास्कही दिला जात होता. आता मात्र सॅनिटायझर दिले जात नाही. मास्क हनुवटीला अडकवून एसटीत चढणाऱ्या प्रवाशांना वाहकांकडून हटकले जाते.
बॉक्स
२० कोटींचे नुकसान
प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाल्याने दीड महिन्यांत अमरावती विभागाचे साधारणपणे २० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. लॉकडाऊन संपेपर्यत आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागणार आहे.
बॉक्स
प्रवासी घरातच
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक संचारबंदीमुळे अनावश्यक फिरताना आढळल्यास कारवाई होत असल्याने नागरिक घराबाहेर पडणेच टाळू लागल्याने एसटीचे प्रवासी सध्या घरातच आहेत.
बॉक्स
प्रमुख मार्गांवर वाहतूक
१) अमरावती विभागातून राज्य परिवहन महामंडळामार्फत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या अन्य प्रवाशांच्या सोईसाठी आजघडीला नागपूर, यवतमाळ, परवाडा, दर्यापूर, वरूड, अकोला मार्गावर एसटी बस धावत आहेत.
२) नागपूर, यवतमाळ, परतवाडा, दर्यापूर, अकोला या मार्गांवर प्रवासी संख्या समाधानकारक मिळत असल्याने, शिवाय येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने बस सोडल्या जात आहेत.
३) शासनाकडून खासगी वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले असल्याने एसटीला चांगले दिवस आले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे एसटीचे अर्थिक चक्र पुन्हा बिघडले आहे. अत्यावश्यक सेवा देत असताना नुकसानही सोसावे लागत आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण बस - ३८५
सध्या सुरू असलेल्या बस - ६०
एकूण कर्मचारी - २५००
कर्तव्यावर वाहक - ६०
कर्तव्यावर चालक - ६०
वाहक -८६५
चालक-८००
बॉक्स
बस सुरू झाली अन जिवात जीव आला
कोट
गत दोन महिन्यांपासून एसटी बस बंद होती. अनेकांना ड्युटी न मिळाल्याने रोजगारही कमी झाला होता. आता बस सुरू झाल्याने जिवात जीव आला. वेतन होणार, याची शाश्वती मिळाली आहे. यामुळे डोक्यावरचे टेन्शन कमी झाले.
- बाळासाहेब राणे, वाहक
कोट
ड्युटी मिळण्याची प्रतीक्षा अनेकांना होती. रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन नसल्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. एसटी सुरू होणे हा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. पूर्वीच्या तुलनेत बसफेऱ्या वाढल्याने समाधानाची बाब आहे.
- ज्ञानेश्वर खोंड, चालक