पोस्ट कोविड २७० रुग्णांवर उपचार अन् समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:12 AM2021-04-22T04:12:22+5:302021-04-22T04:12:22+5:30
अमरावती : कोरोना उपचारानंतर घरी परतलेल्या रुग्णांना निरामय आरोग्यासाठी समुपदेशन व आहार-व्यायामाबाबत मार्गदर्शनासाठी येथील जिल्हा क्षयरोग रुग्णालयात स्थापित ...
अमरावती : कोरोना उपचारानंतर घरी परतलेल्या रुग्णांना निरामय आरोग्यासाठी समुपदेशन व आहार-व्यायामाबाबत मार्गदर्शनासाठी येथील जिल्हा क्षयरोग रुग्णालयात स्थापित पोस्ट कोविड केअर सेंटरचा चांगला लाभ होत आहे. आतापर्यंत २७० रुग्णांनी येथील सेवेचा लाभ घेतला असून, अधिकाधिक रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आरोग्य संवर्धनात वैद्यकीय सल्ला व तपासण्यांचे महत्व मोठे आहे. आजार बरा झाल्यानंतरही शारीरिक थकवा घालवणे, मानसिक क्षमता वाढविणे व आयुष्याची गुणवत्ता सुधारणे आवश्यक असते. त्यासाठी गत नोव्हेंबरमध्ये सीएस डॉ. श्यामसुंदर निकम व डॉ. दिलीप रणमले यांच्या मार्गदर्शनात केंद्र सुरु करण्यात आले. याचा अधिकाधिक नागरिकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
केंद्रात वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या वाठोडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश डहाके, डॉ. मृणाल हरले, पवन दुभे, आकांक्षा खाडे अशी टीम कार्यरत आहे. पोस्ट कोविड उपचार व समुपदेशनासाठी या केंद्राचा लाभ होत असून, अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा आदींनी केले आहे.
बॉक्स
फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यावर भर
या केंद्रात रुग्णाच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढविणे, श्वसनासंबंधी व्याधी कमी करणे, सीओपीडी लक्षणे कमी करणे, शारीरिक क्षमता वाढविणे, दैनंदिन जीवनकार्य सुधारणे, भावनिक आरोग्य सुधारणे आदींसाठी समुपदेशन व आवश्यक औषधोपचार दिला जातो. याशिवाय सात ते आठ प्रकारचे व्यायाम करुन घेतले जातात. त्यासाठी ट्रेड मिल, एअर बाईक, स्पायरोमीटर, एक्झरसाईज बॉल, पिकप-लो एक्स्पायरेटरी मीटरद्वारे फुफ्फुसाची क्षमता तपासणे, कमी असल्यास सुरळीत करणे आदी सेवा केंद्रात पुरवली जाते.
बॉक्स
पोस्ट कोविड रुग्णांमध्ये ही लक्षणे
कोरोना आजारानंतर रुग्णाला काही दिवस अशक्तपणा, थकवा, काम करण्यास उत्साह कमी होणे, पायांत गोळे येणे, हातपाय दुखणे, चक्कर येणे, धाप लागणे, चक्कर येणे, पचनशक्ती कमी येणे, थकवा अशी लक्षणे आढळू शकतात. कधी रुग्णाला एकटेपणा, सामाजिक संपर्काचा अभाव, भावनात्मक बदल जाणवतात. अशा रुग्णांना पोस्ट कोविड केअर सेंटरमधून सेवा दिली जाते.