एक रूपया सेवाशुल्कात गुरांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2017 12:16 AM2017-07-01T00:16:09+5:302017-07-01T00:16:09+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतीपूरक व्यवसाय असणाऱ्या दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन तसेच दूध विक्रीच्या सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाचा ‘महादूध’ प्रकल्प राबविण्यात येत आहे.
२४८ गावांची निवड : महादूधद्वारा पशुसमृद्धी सप्ताह
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतीपूरक व्यवसाय असणाऱ्या दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन तसेच दूध विक्रीच्या सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाचा ‘महादूध’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअतंर्गत २९ जून ते ५ जुलैदरम्यान पशुसप्ताह राबविण्यात येत आहे. यामध्ये एक रूपया सेवाशुल्कात जनावरांवर ऊपचार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील २४८ गावांची निवड करण्यात आली आहे.
विदर्भ व मराठवाड्यातील ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना व राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्डच्या सहकार्याने ११ जिल्ह्यात ‘महादूध’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातदेखील मदर डेअरीमार्फत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील २४८ गावांची निवड करण्यात येऊन कामास सुरूवात झाली आहे. या पशुसमृद्धी सप्ताहामध्ये पशुरोग निदान व वंधत्व निवारण शिबिर, कृत्रिम रेतन, उपचार व लसीकरण, गर्भ तपासणी, गोचिड, गोमाशा औषध फवारणी आदी उपक्रम राबविण्यासाठी शिबिरांचा प्रकल्पनिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी या सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंर्वधन उपायुक्त मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंर्वधन अधिकारी विजय रहाटे यांनी केले आहे.