ठिकठिकाणी वृक्ष कोसळले

By admin | Published: April 9, 2015 12:23 AM2015-04-09T00:23:02+5:302015-04-09T00:23:02+5:30

बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत कडाक्याचे ऊन तापले होते. त्यानंतर आकाशात ढगांची गर्दी झाली आणि पावसाची लक्षणे दिसू लागली.

The tree collapsed everywhere | ठिकठिकाणी वृक्ष कोसळले

ठिकठिकाणी वृक्ष कोसळले

Next

अमरावती : बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत कडाक्याचे ऊन तापले होते. त्यानंतर आकाशात ढगांची गर्दी झाली आणि पावसाची लक्षणे दिसू लागली. सोबतच सोसाट्याचा वारा सुटला. धुळीचे लोट आसमंतात पसरले. वादळाची तीव्रता प्रचंड असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांची त्रेधा उडाली. होर्डींग्ज, बॅनर तुटून रस्त्यावर येऊन पडले. काही ठिकाणी झाडे पडली. नवाथेनगर, न्यू प्रभात कॉलनी, पोलीस लाईन, स्वस्तीकनगर, श्रीकृष्ण पेठच्या वळणावरील एका शो रूमच्या काचेचे फ्रेमिंग रस्त्यावर येऊन पडले. या काचा इस्तत: पसरल्या. या काचांनी मार्गावरून ये-जा करणारे काही लोक जखमी झाले. या शो-रूमच्या खाली असलेल्या दुचाकी दुरूस्तीच्या दुकानात दुचाकी सुधरविण्यासाठी आलेल्या नसीब खाँ हमिद खां (५५, ताजनगर) याच्या अंगावर काचा पडल्याने तो जखमी झाला. अन्य जखमींमध्ये रसवंती चालक राम उजागर (२७), रामकरण लोधी (११), राहुल रामनिवास लोधी (१०), सुनील लोधी (१४), रामकरण देविकर (३८), अनंत लक्ष्मण राक्षसकर (३६,रा. रमाबाई आंबेडकरनगर), धिरजसिंग रणजितसिंग कटारिया (२२, कपिलवस्तू नगर) यांचा समावेश आहे. अग्निशमन दलाचे अधीक्षक भरतसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनात शहरातील आपात्कालिन स्थितीचा सामना करण्याकरिता सय्यद अन्वर, दिलीप चौखंडे व पथकाने ठिकठिकाणी पोहोचून मदत कार्य वेगाने सुुरू केले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळली. अमरावती-बडनेरा मार्गावरील साईनगर परिसरात दोन मोठी झाडे उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. शहरात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळल्याची माहिती आहे.

१२ एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस
बुधवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. येत्या १२ एप्रिलपर्यंत पावसासाठी अनुकुल स्थिती असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. पश्चिम मध्यप्रदेश ते आसामपर्यंत कमी दाबाची स्थिती असून त्यांच्या योगाने पश्चिम बंगाल व बांग्लादेशावर चक्राकार वारे वाहत आहेत. जम्मू-काश्मीरवर पश्चिमी विक्षेप संक्रिय आहे. त्यातच पंजाब व पाकिस्तानच्या दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे व हिंदी महासागरात ढगांची गर्दी आहे. ही सर्व परिस्थिती पावसासाठी अनुकूल असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला आहे. त्यामुळे येत्या १२ एप्रिलपर्यंत विदर्भातील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: The tree collapsed everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.