वृक्ष लागवडीचा बट्ट्याबोळ

By admin | Published: May 25, 2017 12:10 AM2017-05-25T00:10:33+5:302017-05-25T00:10:33+5:30

शासनाने मोठा गाजावाजा करून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठरवून दिले व त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात आले.

Tree Planting | वृक्ष लागवडीचा बट्ट्याबोळ

वृक्ष लागवडीचा बट्ट्याबोळ

Next

नांदगावात झालेच नाही रोपट्यांचे संवर्धन : पाण्याअभावी झाडे सुकली, लाखोंचा खर्च वाया
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : शासनाने मोठा गाजावाजा करून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठरवून दिले व त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, ही वृक्ष लागवड केवळ ‘फोटोसेशन’पुरती मर्यादित राहिल्याने तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. पाण्याअभावी बहुतांश झाडे सुकली असून तालुक्यात वृक्ष लागवड योजना फसल्याचे दिसून येत आहे.
प्रशासकीय पातळीवर तहसील कार्यालयाला १३३९३ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते तर नगरपंचायतीला ५०० झाडांचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. सन २०१५-१६ च्या वृक्ष लागवड योजनेत तहसील कार्यालयामार्फत८३०० झाडे लावण्यात आली तर नगर पंचायतीच्यावतीने सुद्धा ५०० झाडे लावण्यात आली. त्याचप्रमाणे पंचायत समितीमार्फत देखील काही प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. तालुक्यातील बहुतांश गावांत तसेच नांदगाव शहरात राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा वृक्षलागवड केली. परंतु वृक्षारोपणानंतर याझाडांच्या संगोपनाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्यामुळे शतकोटी वृक्ष लागवड योजनेतील एकही झाड जिवंत नसल्याचे दिसून येत आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने मोठा आटापिटा केला. परंतु प्रशासकीय पातळीवर योजनेला ठेंगा दाखविला जात असल्याने शासनाच्या आदेशाला प्रशासन कसा हरताळ फासत आहे, ही बाब यावरून निदर्शनास येते. पर्यावरणाशी संबंधित संभाव्य धोका टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या वृक्षलागवड योजनेतच जर प्रशासन हलगर्जीपणा करीत असेल तर योजनेचा उद्देश कसा सफल होणार, हा प्रश्नच आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे पद मागिल काही दिवसांपासून रिक्त असल्यामुळे शतकोटी वृक्ष लागवड योजनेची ऐशीतैशी झाली आहे.

२०१७-१८ मध्ये मिळेल का योजनेला यश ?
सन २०१७-१८ मध्ये सुद्धा वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जाणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर शासनाची दिशाभूल होऊ नये, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. निव्वळ वृक्ष लागवड करून होेणार नाही तर त्यांची जोपासना होणे सुद्धा गरजेचे आहे. अन्यथा सन २०१५-१६ च्या शतकोटी वृक्षलागवड योजनेचा ज्याप्रमाणे बट्ट्याबोळ झाला तशीच गत सन २०१७-१८ मध्ये झाल्यास योजनेचे पूर्णत: बारा वाजतील, हे निश्चित आहे. त्यामुळे सन २०१७-१८ ची वृक्ष लागवड प्रशासकीय अधिकारी यशस्वीपणे पार पाडतील का, याबाबत शंकाच आहे.

Web Title: Tree Planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.