...आणि मेळघाटात चक्क झाडे बोलू लागली! महिन्याला १० महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 09:56 AM2023-08-24T09:56:27+5:302023-08-24T09:56:50+5:30
क्यूआर कोडचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले
नरेंद्र जावरे, लोकमत न्यूज नेटवर्क, चिखलदरा (जि. अमरावती): मेळघाटातील आरोग्याला बळ देणाऱ्या दुर्मीळ, अतिदुर्मीळ वनस्पतींच्या खजिन्याची ओळख करून देण्यासाठी व त्यांचे जतन होऊन आदिवासी विद्यार्थ्यांना त्यातून रोजगार मिळावा, या हेतूने साकारलेल्या चिखलदरा येथील वनस्पती उद्यानात आता झाडे बोलू लागली आहेत. मी कोण, माझे महत्त्व काय, हे प्रश्न क्यूआर कोड स्कॅन करताच झाडे सांगू लागतात.
या क्यूआर कोडचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. सिपना कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या प्राध्यापक उज्ज्वला कोकाटे (मुरतकर) यांनी २०११ पासून दुर्मीळ झाडांचे जतन केले. यूजीसीच्या अनुदानातून २०१७ नंतर महाविद्यालय त्याची देखभाल करीत आहे. सर्टिफिकेट कोर्सच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार देण्याचा प्रयत्न होत आहे.
टॉकिंग ट्री ॲप
वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ.यू.आर. कोकाटे (मुरतकर) व नागपूरच्या धनवटे कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. सारंग धोटे यांनी तयार केलेल्या ‘टॉकिंग ट्री ॲप’चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. वृक्षावरील क्यूआर कोड स्कॅन करून त्या वृक्षासंबंधी माहिती सहजपणे मिळते.
उद्यानात या दुर्मीळ वनस्पती
उद्यानात रक्तचंदन, सर्पगंधा, केवकन, बिजासाख, रानहळद, आंबेहळद, रानविलायची, जंगली लेंडी, राणा लसूण, रानकांदा, जंगली अद्रक, गूळमार्क, सैतूस, समुद्रशोष, हाडजोड, शतावरी, अशा विविध कंदवर्गीय, मूळवर्गीय व पानवर्गीय वनस्पती आहेत.