वृक्षलागवड संपली, वृक्षकटाई सुरू
By admin | Published: July 10, 2017 12:11 AM2017-07-10T00:11:25+5:302017-07-10T00:11:25+5:30
राज्य शासनाने १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात चार कोटी वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला.
मुख्य उद्देशालाच हरताळ: रस्ता चौपदरीकरणात हिरव्या झाडांची कत्तल
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : राज्य शासनाने १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात चार कोटी वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग या उपक्रमाला हरताळ फासत असल्याचे चित्र आहे.
‘एकच लक्ष्य चार कोटी वृक्ष’ या ब्रिदानुसार तालुुक्यात दोन लाखांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड झाली. पंरतु, वरूड ते पांढुर्णा रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल केली जात आहे. यामुळे विकासाच्या नावावर वृक्ष लागवड अभियानालाच हरताळ फासण्याचा प्रकार सुरूअसल्याचे चित्र आहे. नांदगाव पेठ ते पांढुर्णा हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने चौपदरीकरणाला सुरूवात झाली. वरूड ते पांढुर्णा राज्य महामार्ग असून यामहामार्गाच्या कडेला हजारो झाडे आहेत. मात्र, विकास व रस्ते रूंदीकरणाच्या नावावर हजारो हिरव्या झाडांचा बळी जाणार आहे. रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली असल्याने निंब, बाभळीसह आडजातीच्या वृक्षांची देखील सर्रास कत्तल सुरु आहे.
पर्यावरण संवर्धनाचे काय?
शासनाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी व नेते मंडळी आपले फोटो प्रसिद्ध करून चांगलीच प्रसिद्धी मिळवितात. मात्र, प्रत्यक्षात वृक्ष संगोपनाची जबाबदारी कुणीच घ्यायला तयार होत नाही. हा पर्यावरण संवर्धनालाच हरताळ फासण्याचा प्रकार असल्याचे मत आता जाणकार व्यक्त करीत आहेत. एकीकडे वृक्षारोपण दुसरीकडे वृक्षकटाई असा दुटप्पी कार्यक्रम शासन राबवित असल्याचा आरोप केला जात आहे.