अनलॉकमध्येही आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहे ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:28+5:302021-06-16T04:16:28+5:30

शिक्षणाचा खेळखंडोबा सुरूच, मोबाईल रेंजअभावी आदिवासी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित अमरावती : कोरोना संसर्गामुळे गतवर्षी मार्चपासून शाळा, महाविद्यालये बंद ...

Tribal Ashrams, Hostels 'Locked' in Unlock | अनलॉकमध्येही आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहे ‘लॉक’

अनलॉकमध्येही आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहे ‘लॉक’

Next

शिक्षणाचा खेळखंडोबा सुरूच, मोबाईल रेंजअभावी आदिवासी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित

अमरावती : कोरोना संसर्गामुळे गतवर्षी मार्चपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. राज्य शासनाने सोमवारपासून संचारबंदीचे निर्बंध शिथिल केल्यामुळे यंदा जूनपासून आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा, वसतिगृहे सुरू होतील, असे संकेत होते. मात्र, अनलॉकमध्येही आदिवासी विद्यार्थी पुढील निर्णयापर्यंत ‘लॉक’च असतील, हे वास्तव आहे.

शासनाच्या आदेशानुसार कोरोनाकाळात आदिवासी विकास विभागाने ऑनलाईन शिक्षणाचा प्रयाेग राबविला. परंतु, दऱ्याखोऱ्यात, वस्ती, वाड्यांवर वास्तव्यास असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांकडे ना मोबाईल आहे, ना रेंज. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून ५० ते ६० टक्के आदिवासी विद्यार्थी दूरच राहिले. राज्यात बहुतांश आश्रमशाळा, वसतिगृहे ही कोरोनाकाळात क्वारंटाईन सेंटर, कोविड केअर सेंटर म्हणून वापरण्यात आले आहेत. आजही अनेक जिल्ह्यातील ‘ट्रायबल’ची वसतिगृहे, आश्रमशाळा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महापालिका वा आरोग्य यंत्रणेच्या ताब्यात आहेत. राज्य शासनाने जूनपासून अनलॉकचा निर्णय घेतला असला तरी शिक्षण व्यवस्थेला थोडे दूरच ठेवले आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १५ जूनपासून ऑनलाईन शिक्षणाची मुभा दिली आहे. मात्र, निवासी आश्रमशाळा, वसतिगृहांतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन कधी, कसे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-----------------

अमरावती अपर आयुक्त स्तरावर स्थिती

अनुदानित आश्रमशाळा : १२१

विद्यार्थी संख्या : ४६८०७

------

शासकीय आश्रमशाळा : ८२

विद्यार्थी संख्या : २६२३९

-------

वसतिगृहे : १०४

विद्यार्थी संख्या : ११२०५

----------

प्रकल्हनिहाय अनुदानित आश्रमशाळांचे विद्यार्थी

धारणी : १०८४१

अकोला : ७२६४

पांढरकवडा : ८२४३

पुसद : ५९१५

किनवट : ८६९०

कळमनुरी : ३२१२

औरंगाबाद :२६४२

---------------

मराठवाड्यातील आश्रमशाळा १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. विदर्भात २६ जूनपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. तथापि, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण सेतुच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. वर्ग शिकवणी तूर्त नाही, असे वरिष्ठांचे आदेश आहेत.

- विनाेद पाटील, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती.

Web Title: Tribal Ashrams, Hostels 'Locked' in Unlock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.