नोकरीचे आमिष दाखवून मेळघाटातील आदिवासी मुलांचे अपहरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 06:46 PM2018-01-19T18:46:20+5:302018-01-19T18:46:42+5:30
पुण्यातील एका कारखान्याच्या कामासाठी तालुक्यातील धारणमहू येथून आठ मुले घेऊन जाणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या आठ मुलांना डांबून ठेवल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पुण्यातील एका कारखान्याच्या कामासाठी तालुक्यातील धारणमहू येथून आठ मुले घेऊन जाणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या आठ मुलांना डांबून ठेवल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी तालुक्यातील धारणमहू येथील नारायण बंसी जावरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा १५ वर्षीय मुलगा रवींद्रसह अन्य सात मुलांना पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील सेक्टर ७, प्लॉट ३ मधील ऋग्वेदांत पावडर कोटिंग या कंपनीतील प्रवीण गावंडे व संजय पाटील हे कामाला लावून देण्याचे आमिष दाखवून घेऊन गेले. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी गावातून गेल्यापासून पालकांचा मुलांशी संपर्क होऊ शकला नाही. गावंडे व पाटील यांच्याशी संपर्क केल्यावर मुलांना परत पाठवतो, एवढेच उत्तर मिळत आहे. अखेर त्रस्त झालेल्या पालकांनी धारणी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी भादंविचे कलम ३६३, ३३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
प्रथमच तक्रार
मेळघाटातून रोजगाराचे आमिष दाखवून आदिवासींना परप्रांतात किंवा मोठ्या शहरात घेऊन जाण्याचे प्रमाण मोठे आहे. येथील अनेक आदिवासींनी रोजगारासाठी मेळघाटातून पाय काढला. मात्र, प्रथमच शाळकरी मुलांना घेऊन गेल्यावर त्यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अशी आहेत मुलांची नावे
रवींद्र नारायण जावरकर, श्रीराम शोभाराम पाटणकर, सुमीत सुरेश धांडे, रीतेश चम्पालाल मावस्कर, राहुल कोम्बा भिलावेकर, मुन्नू ताराचंद कासदेकर, रामेश्वर कैलास कासदेकर, कृष्ण जीवन मावस्कर यांचा समावेश आहे. यापैकी काही मुले शाळकरी विद्यार्थी आहेत, तर काहींनी शाळा सोडली आहे.
अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, मुलांचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक पालकांसह रवाना करणार आहे. या प्रकरणाचा आम्ही सर्वांगाने तपास करीत आहोत.
- किशोर गवई, ठाणेदार, धारणी