डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी चिमुकल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:15 AM2021-08-22T04:15:55+5:302021-08-22T04:15:55+5:30

आई-वडिलांचा आरोप, दोन दिवसाच्या बाळाचे होणार शवविच्छेदन, मेळघाटात रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास फोटो कॅप्शन - दोन दिवसांच्या चिमुकल्याला घेऊन ...

Tribal Chimukalya dies due to negligence of doctors and staff | डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी चिमुकल्याचा मृत्यू

डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी चिमुकल्याचा मृत्यू

Next

आई-वडिलांचा आरोप, दोन दिवसाच्या बाळाचे होणार शवविच्छेदन, मेळघाटात रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास

फोटो कॅप्शन - दोन दिवसांच्या चिमुकल्याला घेऊन आदिवासी माता

चिखलदरा : चुरणी ग्रामीण रुग्णालयात चिमुकल्याचा शनिवारी पहाटे ५ वाजता जीव गेला. आरोग्य यंत्रणेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी आदिवासी दाम्पत्याने आमदार राजकुमार पटेल यांच्याकडे केल्यानंतर यंत्रणा हलली. आता तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत दोन दिवसांच्या या चिमुकल्याचे शवविच्छेदन करून सत्यता तपासली जाणार आहे.

मेळघाटात कुपोषित बालकांचा मृत्यू होत असल्याची बाब नेहमीची आहे. परंतु, एम.ए. वडील व परिचारिका प्रशिक्षण केलेल्या मातेच्या दोन दिवसाच्या चिमुकल्याच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा उघडकीस आणला. बुटीदा येथील अंजली अजय अखंडे यांना १८ ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी तिची प्रसूती झाली. बाळाचे जन्मत:च वजन कमी असल्याचे अंजली यांच्या लक्षात आले. ही बाब हजर परिचारिका, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले. शनिवारी सकाळी बाळ दगावले.

----------------- कोणीच नाही ऐकले साहेब!

शुक्रवारी रात्रभर कर्तव्यावर हजर परिचारिकांना बाळाच्या प्रकृतीसंदर्भात सांगितले. परंतु, त्यांनी सतत टाळाटाळ केली. डॉक्टरांनासुद्धा बोलावण्याचे कर्तव्य पार पाडले नाही, असा अनुभव अजय अखंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

बॉक्स

चिमुकल्याचे शवविच्छेदन

आमदार पटेल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषींवर कारवाई करण्याची मागणी करताच आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. आता या चिमुकल्याचे बालरोगतज्ज्ञ व वरिष्ठ डॉक्टरांच्या उपस्थितीत शवविच्छेदन होणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी साहेबलाल धुर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली

बॉक्स

रुग्णालये जीव वाचवण्यासाठी की मारण्यासाठी?

मेळघाटातील आरोग्य यंत्रणा सतत या ना त्या कारणाने वादग्रस्त ठरत आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या केलेल्या प्रतिनियुक्त्यासुद्धा चर्चेत आल्या असताना चुरणी ग्रामीण रुग्णालयातील हा प्रकार संताप व्यक्त करणारा ठरला आहे.

कोट

बाळ कमी वजनाचे नव्हे, तर सुदृढ जन्माला आले. त्याचे वजन २ किलो ३०० ग्रॅम होते. बाळाचा श्वसननलिकेत दूध गेल्याने मृत्यू झाला. तज्ज्ञ डॉक्टरांकडून शवविच्छेदन केल्यावर सर्व बाबी स्पष्ट होईल.

- साहेबलाल धुर्वे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, चुरणी

कोट

मेळघाटात आरोग्य यंत्रणेने मोठ्या प्रमाणात घोळ निर्माण केला आहे. आरोग्यमंत्र्यांना तशी तक्रार केली. चुरणी ग्रामीण रुग्णालयात जीव जाणे ही गंभीर बाब आहे. दोषींवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना सांगितले आहे.

- राजकुमार पटेल, आमदार, मेळघाट

Web Title: Tribal Chimukalya dies due to negligence of doctors and staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.