आदिवासी विकास महामंडळाची मका खरेदी वांद्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:08 AM2020-12-28T04:08:26+5:302020-12-28T04:08:26+5:30
चिखलदरा : अतिदुर्गम हतरू, जारिदा परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदिवासी विकास महामंडळामार्फत चुरणी येथे गोदामात ठेवण्यात आलेल्या मका खरेदी केंद्राला ...
चिखलदरा : अतिदुर्गम हतरू, जारिदा परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदिवासी विकास महामंडळामार्फत चुरणी येथे गोदामात ठेवण्यात आलेल्या मका खरेदी केंद्राला १५ दिवसांपासून टाळे लागले आहे. परिणामी २५० पेक्षा अधिक आदिवासी शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे त्यांचा मका घरातच पडून आहे.
आदिवासी शेतकऱ्यांची लुबाडणूक होऊ नये, त्यांनी पिकवलेल्या धान्याचे योग्य दर मिळावेत, यासाठी आदिवासी विकास महामंडळामार्फत सोयाबीन, तूर, मका, गहू आदी धान्याची खरेदी करण्यात येते. यंदा हतरू व जारिदा परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी चुरणी येथे मका खरेदी केंद्र उघडण्यात आले होते. काही दिवस व्यवस्थित सुरू राहिलेले हे केंद्र १५ दिवसांपासून टाळेबंद असल्याची तक्रार चुरणी येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल भक्ते यांनी केली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शेतकरी झोलो चिमोटे, अरुणा हरिदास, लहू येवले यांच्यासह चुरणी, काजलडोह, गांगरखेडा, दहेंद्री, कोटमी, जारिदा, कामिदा, भंडोरा परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात संबंधित महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
-------------