अमरावती विद्यापीठात आदिवासींना न्याय केव्हा? अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत राज्यपालांना निवेदन
By गणेश वासनिक | Published: March 12, 2023 05:30 PM2023-03-12T17:30:16+5:302023-03-12T17:31:30+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र सुरु करण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे ट्रायबल फोरमने केली आहे.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र सुरु करण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे ट्रायबल फोरमने केली आहे. अमरावती विद्यापीठ अंतर्गत यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती विद्यापीठात अन्य महापुरुषांच्या विचारधारेवर अध्यासन केंद्र सुरु आहेत. परिणामी आदिवासी अध्यासन केंद्र सुरु करून विद्यार्थी, संशोधकांना न्याय प्रदान करावा, अशी मागणी पुढे आली आहे.
यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. अमरावती जिल्ह्यात मेळघाट, धारणी, चिखलदरा, तर अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शिटाकळी, बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर, जळगाव जामोद, चिखली, खामगाव हे तालुके आदिवासी बहुल असून वाशीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव आहेत. काळाच्या ओघात आपली भाषा, कला, संस्कृती नष्ट होऊ नये म्हणून आदिवासी समाज आपली बोलीभाषा, कला व संस्कृती संवर्धन करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. आज महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यापीठात 'आदिवासी साहित्य ' हा विषय अभ्यासक्रमात आहे. अनेक विद्यार्थी, संशोधक प्राध्यापक आदिवासी साहित्य व तत्संबंधीत विषयावर पीएचडी करीत आहे.
यासाठी हवे आदिवासी अध्यासन केंद्र
- राज्यातील आदिवासी बोलीभाषा व अन्य बोलीभाषा यांचा तौलनिक अभ्यास
- देशामधील अन्य राज्यात बोलल्या जाणाऱ्या आदिवासी बोलीभाषांचा शास्त्रीय, तौलनिक अभ्यास
- आदिवासी संस्कृती आणि मानवी व्यवहार, विकासाच्या संकल्पना आणि आधुनिकता यांचा अभ्यास
- आदिवासी समुदाय यांची भाषा, संस्कृती,साहित्य व विकास यांचा तौलनिक अभ्यास.
- आदिवासी मधील स्थापत्यकला, आयुर्वेद, वैद्यकशास्त्र, आभूषणे, काष्ठ शिल्पशास्त्र, धातुकलाशास्त्र, न्रुत्यकला,वाद्यकला यांचा उगम, विकास व सद्यस्थितीत त्यांच्या विकासाची दिशा यांचा अभ्यास.
- आदिवासींची जल,जंगल व जमीन विषयक भूमिका आणि त्यासंबंधाने झालेले कायदे यांचाही अभ्यासक व संशोधकांना अभ्यास करता येईल.
देशभरात आदिवासी जमातींची बोलीभाषा व अन्य लोकभाषा संबंधी भाषातज्ञ चिंता व्यक्त करीत आहे. या बोलीभाषा, लोकभाषा टिकविल्या पाहिजेत. त्यांचे जतन व संवर्धन झाले पाहिजे. तुलनात्मक अभ्यास होऊन संशोधन होणे गरजेचे आहे. यामधून राज्यातील नव्हे तर देशभरातील विद्यार्थ्यांना नवी विद्याशाखा मिळेल. याकरिता अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्यासन, अभ्यास व संशोधन केंद्राची आवश्यकता आहे. - ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम महाराष्ट्र.