आदिवासी मजुरांना नेणारा ट्रॅक्टर उलटला, २० जखमी तीन गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 09:24 PM2019-07-01T21:24:34+5:302019-07-01T21:25:16+5:30
तीन गंभीर : अंजनगाव थांब्यावरील घटना
परतवाडा (अमरावती) : लगतच्या बेलखेडा आणि हत्तीघाट या आदिवासी पाड्यातील जवळपास ४० मजुरांना पांढरी येथे घेऊन जाणारा भरधाव ट्रॅक्टर उलटला. या अपघातात तीन मजूर गंभीर, तर २० जण किरकोळ जखमी झाले. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अंजनगाव थांब्यालगत ही घटना घडली. या घटनेने अकोला-चिखलदरा मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.
एमएच ३० बी ८८०९ या क्रमांकाचा ट्रॅक्टरमधून ४० मजूर नजीकच्या पांढरी येथे शेतात पेरणीसाठी जात होते. अंजनगाव थांब्यावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉली उलटली. त्यात काही मजूर रस्त्यावर फेकले गेले, तर काही ट्रॉलीखाली दबले. त्यात त्यांच्या हातापायासह डोक्याला मार लागला. त्यातील रूपी रामचंद्र काळे (२५, रा. बेलखेड़ा), नीला अशोक सावरकर (२४, रा. हत्तीघाट), पिंकी बावसकर (१४, रा. हत्तीघाट) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य जखमींमध्ये उषा सावरकर (१८), दुर्गा राजू बावसकर (२५), यशोदा शंकर दहीकर (१७), लीला अशोक सावरकर (२३), सपना मनोहर बेलसरे (२५), सचिन भोला बेलसरे (२१), बाली राजू बेलसरे (१५), मीना गणेश दारसिंबे (३०), राजू रमेश पाटणकर (२१), संतोष संतू बेठेकर (२४, सर्व रा. हत्तीघाट) व गंगू मंगल भूसूम (५०), चैता सोमा कासदेकर (२५), रामरती रामकिशन उमरकर (२५), बाला अखंडे (४०), किरण नामदेव जामूनकर (१८), रविना बंसी भुसूम (१६), सोनू गंगाराम दारसिंबे (३०, सर्व रा. बेलखेडा) आदींचा समावेश आहे.
वाहतूक पोलीस शहराबाहेर
परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरांतील अनियंत्रित वाहतूक व्यवस्था सतत चर्चेत असताना, येथील वाहतूक विभागाचे कर्मचारी शहराबाहेर दिसत असल्याचे सर्वश्रुत आहे. ट्रॅक्टरमध्ये मजुरांना बेदरकार कोंबून नेले जात असतानाही कुठल्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. वाहतूक पोलीस शहर वाºयावर सोडून धारणी, अमरावती व अकोला या महामार्गावर वसुलीत मग्न असल्याची तक्रार शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अचलपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे झालेल्या एका बैठकीत केली होती. त्यानंतरसुद्धा कुठल्याच प्रकारची सुधारणा झाली नाही.