आदिवासींचे शिदोरी आंदोलन
By admin | Published: September 20, 2016 12:17 AM2016-09-20T00:17:47+5:302016-09-20T00:17:47+5:30
आपल्या विविध मागण्यांसाठी तालुक्यातील शेकडो आदिवासींनी सोमवारी दुपारी १ वाजता शिदोरी आंदोलन करून प्रशासनाला एक निवेदन दिले,
बीडीओंच्या कक्षात ठिय्या : चिखलदऱ्यात मागण्यांसाठी शेकडो काँग्रेसी एकवटले
चिखलदरा : आपल्या विविध मागण्यांसाठी तालुक्यातील शेकडो आदिवासींनी सोमवारी दुपारी १ वाजता शिदोरी आंदोलन करून प्रशासनाला एक निवेदन दिले, तर वादग्रस्त ठरलेल्या ग्रामसेवकाच्या हकालपट्टीसाठी पंचायत समिती खंडविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.
मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे, पं.स. सभापती दयाराम काळे, तालुकाध्यक्ष मिश्रीलाल झाडखंडे, महेंद्र गैलवार, वनमाला खडके, पुन्या येवले, बन्सी जामकर, रजनी बेलसरे यांच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी १ वाजता येथील नगरपालिका विश्रामगृह पटांगणावर शेकडो आदिवासी जमा झाले होते. तालुक्यातील दारिद्र्यरेषेंतर्गत वीस गुण प्राप्त प्रतीक्षा यादीतील ५७५० लाभार्थ्यांना घरकूल द्यावे, मेळघाटातील आदिवासींना खावटी कर्ज देण्यात यावे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ व वृद्धापकाळ लाभार्थ्यांचे प्रकरण मंजूर करून त्यांना नियमित पेन्शन द्यावी, रोहयोच्या मजुरांना मुबलक काम व वेळेवर वेतन देण्यात यावे, नरेगा अंतर्गत ६० व ४० टक्के कुशल निधीचे नियोजन ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावे, जिल्हा स्तरावर तथा कुशलचे वेतन तत्काळ देण्यात यावे, मंजूर विहिरींचे बांधकाम व धडक सिंचन विहीरी योजनांचे काम तत्काळ करण्यात यावे, पेसा कायदा अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये स्वतंत्र ग्रामसेवकांची नियुक्ती युवकांमधून करण्यात यावी, वन अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, तथा पट्टेधारकांना सातबारा देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार सैफन नदाफ व पोलीस उपनिरीक्षक शेरोकार यांना देण्यात आले. यावेळी मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे, नगराध्यक्ष राजेंद्र सोमवंशी, पं.स. सभापती दयाराम काळे, मिश्रीलाल झाडखंडे, वनमाला खडके, महेंद्र गैलवार आदींनी उपस्थित शेकडो आदिवासींना संबोधित केले. आदिवासींवर वारंवार होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही, शासनाविरुद्ध मोठे आंदोलन उभारून आदिवासीविरोधी कार्य करणाऱ्या शासनाला धडा शिकविण्याचे यावेळी सांगण्यात आले. उपस्थित आदिवासींमध्ये शासनाविरुद्ध रोष उफाळून आला होता. यावेळी पीयूष मालवीय, हिरुजी अकडे, सहदेव बेलकर, बन्सी जामकर, किशोर झाडखंडे, गौरव काळे, रामसिंग चिमोटे, यशवंती उईके, मीरा जामकर, रजनी बेलसरे, भागरती चिमोटे, जयंत खडके, शेख आसिफ, सुषमा मालवीय, नासीरभाई, विकी राठोड यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामसेवकाच्या हकालपट्टीसाठी आंदोलक आक्रमक
तालुक्यातील कोरडा व गांगरखेडा येथील ग्रामसेवक व्ही. आर. यादव सतत अनुपस्थित राहत असल्याने आदिवासींना विविध योजनांचा लाभ मिळत नाही. दाखल्यांसाठी भटकंती करावी लागते. संबंधित ग्रामसेवकाची हकालपट्टी तत्काळ करावी, या मागणीसाठी सोमवारी दुपारी ३ वाजता आदिवासींनी बीडीओ एन. टी. देसले यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. आदिवासींची रास्त मागणी पाहता तत्काळ ग्रामसेवक यादव यांचा पदभार काढण्याचे ठरविले.
अधिकाऱ्यांनीही शिदोरी खाल्ली
आपल्या रास्त मागण्यांसाठी तालुक्यातील शेकडो आदिवासींनी पुकारलेले शिदोरी आंदोलन सोमवारी येथील पालिका विश्रामगृहात सुरू झाले. आदिवासींच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या तहसीलदार सैफन नदाफ व संबंधित अधिकाऱ्यांनी माजी आमदार केवलराम काळे, दयाराम काळे, मिश्रीलाल झाडखंडे, महेंद्र गैलवार, वनमाला खडके आदींसोबत भाकर आणि ठेचा या गरिबाच्या खाद्याची सोबत आणलेली शिदोरी खाऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या.
कलम १३५ मुळे मोर्चा रद्द
जिल्ह्यात कलम १३५ सुरू असल्याने नियोजित मोर्चा रद्द करण्यात आला. त्याऐवजी पालिका विश्रामगृहाच्या पटांगणावर संबंधित अधिकाऱ्यांनी जाऊन आदिवासींचे निवेदन घेतले व त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.