४० गावांतील आदिवासींनी घेतला सुटकेचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:03 AM2019-09-03T01:03:02+5:302019-09-03T01:04:09+5:30
जवळपास ४० गावांत या वाघिणीने दहशत पसरविली. एकाला ठार करण्यासोबत दोघांना जखमी केले. गुरांचा फडशा पाडला. आदरतिथ्य सोडून जिवावर उठलेली अशी पाहुणी नकोच म्हणत तिला आणणाऱ्या वनविभागाला असंतोषाचा सामना करावा लागला. ती आपल्या गावात, शिवारात फिरकू नये, यासाठी विघ्नहर्त्याला साकडे घालण्यात आले. अखेर रविवारी सायंकाळी ती जेरबंद झाली अन् आदिवासी यजमानांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : भारतीय संस्कृतीत ‘अतिथी देवो भव:’ असे सुभाषित आहे. दोन महिन्यांपूर्वी मेळघाटच्या जंगलात आलेल्या पाहुणीने सळो की पळो करून सोडल्यानंतर मात्र यजमानांनाच भीती दाटून आली. एक दोन नव्हे, जवळपास ४० गावांत या वाघिणीने दहशत पसरविली. एकाला ठार करण्यासोबत दोघांना जखमी केले. गुरांचा फडशा पाडला. आदरतिथ्य सोडून जिवावर उठलेली अशी पाहुणी नकोच म्हणत तिला आणणाऱ्या वनविभागाला असंतोषाचा सामना करावा लागला. ती आपल्या गावात, शिवारात फिरकू नये, यासाठी विघ्नहर्त्याला साकडे घालण्यात आले. अखेर रविवारी सायंकाळी ती जेरबंद झाली अन् आदिवासी यजमानांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
एक वाघिण काय करू शकते, तिची दहशत कशी असते, याचा प्रत्यय मेळघाटच्या केकदाखेडा, दादरा, कावडाझिरी, खिडकी, रबांग, धोतरा, बिबामल, भादुबल्डा, कंजोली, राणीगाव, रानापिसा, भवर, रेहट्या, हिराबम्बई, शिवाझरी, डोलार, भांडुम, बैराटेकी, बोरखेडा, गडगामालूर, झिलांगपाटी, तातर, परसोली यांसह तब्बल ४० गावांतील हजारो आदिवासींना आला. ई-वन वाघिणीने पाळीव जनावरांवर हल्ला करण्यासोबत एका आदिवासीचा बळी घेतल्याने समस्थ आदिवासी बांधव प्रचंड दहशतीत आले होते. अगदी गरजच आहे म्हणून शेतात गेलेले आदिवासी सायंकाळपूर्वी घरी परतत होते. रात्रीही घराचा दरवाजा बंद केल्याची चारदा खातरजमा करीत होते. दोन महिन्यांत दुग्ध व्यवसाय आणि सर्वच कामे ठप्प पडली होती. आदिवासींमध्ये वाघिणीसोबतच व्याघ्र प्रकल्पाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला होता. खासदार नवनीत राणा, मेळघाटातील आजी-माजी आमदारांनी या गंभीर प्रश्नांची मांडणी व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंत्रालयात केली होती. आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सबब, एकाचा बळी गेल्यानंतर मुक्त संचारासाठी सोडण्यात आलेल्या वाघिणीला रविवारी जेरबंद करून गोरेवाडा येथील प्राणिसंग्रहालय व बचाव केंद्रात नेण्यात आले.
गणपती बाप्पा... मोरया!
रविवारपर्यंत मेळघाटातील आदिवासी खेडी ई-वन वाघिणीच्या दहशतीत होती. तिला पकडून गोरेवाडा येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळताच सोमवारी दहशतीखाली असलेल्या गावांमध्ये गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. विघ्नहर्त्यानेच विघ्न दूर केल्याचा आनंद आदिवासींच्या चेहºयावर झळकत होता.
दोन महिन्यांपासून आदिवासी वाघिणीच्या दहशतीत होते. रविवारी सायंकाळी गोलाई गावानजीक तिला पकडल्याची माहिती मिळाल्याने मोठे संकट टळले. आम्ही हर्षाने श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली.
- सविता जावरकर सरपंच, रबांग
वाघिणीच्या दहशतीमुळे दैनंदिन कामकाज खोळंबले. मजुरी, शेती, चाºयाचा प्रश्न गंभीर झाला होता. रात्रीप्रमाणेच दिवसाही नागरिक घराबाहेर निघण्यास धजावत नव्हते. तिला जेरबंद केल्याने आमचा जीव भांड्यात पडला.
गोपाल धुर्वे, उपसरपंच, मोर्गदा