वन विभागाच्या जाचाविरोधात आदिवासी बांधवांचा मोर्चा, विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 24, 2023 04:58 PM2023-04-24T16:58:09+5:302023-04-24T16:59:17+5:30
न्याय देण्याची मागणी
अमरावती : महसूल विभागाची पडीक जमीन, गायरान जमीन या जमिनी वाचवा आणि वनविभागाचा भ्रष्ट्राचाराला हटवा, यासह अन्य मागण्यांसाठी आदिवासी एकता मंचद्वारा सोमवारी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.
वन विभागाचा कुठलाही संबंध नसतांना त्यांच्याद्वारा मेळघाट, चांदूरबाजार, परतवाड्यासह जिल्ह्यातील जमिनीवर हुकूमशाही करीत असल्याचा आरोप मोर्चाचे आयोजक पंजाबराव मडावी यांनी केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली, विभागीय कार्यालयावर मोर्चाला पोलिसांनी अडविले. यावेळी रामराव अकंडे, बाळासाहेब वाघमारे, सुमित्रा गायकवाड, विष्णुपंत गवळी, नरेंद्र देशपांडे, राजेश तायडे आदिंनी मोर्चाला संबोधित केले व शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. मोर्चात शेकडो आदिवासी बांधवांचा सहभाग होता.