मेळघाटातील बँकांपुढे आदिवासींच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:14 AM2021-03-26T04:14:00+5:302021-03-26T04:14:00+5:30
फोटो पी २५ चिखलदरा आली होळी : सेमाडोह बँकेत पुन्हा आदिवासींसोबत अरेरावी लोकमत विशेष चिखलदरा/ परतवाडा : मेळघाटातील ...
फोटो पी २५ चिखलदरा
आली होळी : सेमाडोह बँकेत पुन्हा आदिवासींसोबत अरेरावी
लोकमत विशेष
चिखलदरा/ परतवाडा : मेळघाटातील आदिवासींचा सर्वांत मोठा सण म्हणजे होळी. त्या पार्श्वभूमीवर मग्रारोहयोअंतर्गत केलेल्या कामाचे वेतन मिळविण्यासाठी शेकडो आदिवासींच्या सर्व बँकांपुढे रांगा लागल्या आहेत. आदिवासींच्या तीन महिन्यांच्या अडकलेल्या वेतनासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत, शासनाने त्यांच्या वेतनाची रक्कम तहसील व पुढे बँकांना पाठविली. परिणामी, होळीपूर्वी बँकांमार्फत रकमेचे वितरण केले जात आहे. परंतु सेमाडोह येथील बँक कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागणुकीने पुन्हा चर्चेत आली आहे.
मेळघाटात रोजंदारीचा गंभीर प्रश्न आहे. त्यासाठी शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध यंत्रणांमार्फत आदिवासींच्या हाताला काम दिले जाते. हजारो मजुरांचे मागील तीन महिन्यांचे वेतन चिखलदरा, परसापूर, परतवाडा चुरणी, सेमाडोह, टेंब्रूसोंडा इत्यादी बँकेमध्ये आदिवासींचे खाते काढण्यात आले आहे. जमा झालेले वेतन काढण्यासाठी आदिवासी बांधवांनी बँकांकडे रांगा लावल्या आहेत. उशिरा रात्रीपर्यंत विविध बँकांमधून हे वेतन दिले जात आहे.
बॉक्स
बँक कर्मचारी दारू ढोसून!
सेमाडोह येथे हतरू, रायपूर परिसरातील अतिदुर्गम भागात आदिवासींची बँक खाती आहेत. या स्टेट बँकेतील कर्मचारी दारूच्या नशेत आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सोमवारी सायंकाळी येथील कर्मचारी आदिवासींना अर्वाच्च भाषेत बोलत अपमानास्पद वागणूक देत असल्याचा प्रकार घडला. रात्री उशिरापर्यंत आदिवासींना उघड्यावरच वेतनासाठी ताटकळत बसावे लागले. संबंधित कर्मचारी पुन्हा दारूच्या नशेत असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य नानकराम ठाकरे यांनी करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.
बॉक्स
गावातच वेतन देण्याचा प्रयत्न
गावात दवंडी देऊन लोकांना सेतू केंद्रातून पैसे घेण्यासाठी सूचना देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी दिली. प्रत्येक बँकेने गावातच बँक सुविधा देण्यासाठी ‘बँक मित्र’ नियुक्त केले आहेत. त्यांची सभा ठेवण्यात आली आहे. तसेच सेमाडोह बँकेतील प्रकारासंदर्भात बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. धारणी व चिखलदरा तालुक्यातील ३२० गावांमध्ये कुठल्याच प्रकारचे मोबाइल नेटवर्क नाही. वारंवार खंडित होणाऱ्या इंटरनेट सेवेमुळे बँकांची, शासकीय कार्यालयांची कामे सतत खोळंबलेली असतात. अशातच मेळघाटातून अनेक बँका परतवाडा चिखलदारा आदी ठिकाणी पळविण्यात आल्या. आदिवासी पाड्यातून ये-जा करण्यासाठी एसटी बस किंवा इतर खाजगी गाड्यांची सुविधा नाही. त्यातच या बँका ५० ते १०० किलोमीटर अंतरावर असल्याने आदिवासींना वेतनासाठी ससेहोलपट करावी लागत आहे.
कोट
सोमवारी सायंकाळी सेमाडोह येथील स्टेट बँकेचे कर्मचारी आदिवासींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळी करीत होते. रात्री उशिरापर्यंत त्यांना वेतन देण्यात आले नाही. यासंदर्भात तक्रार केली आहे.
- नानकराम ठाकरे,
पंचायत समिती सदस्य, हतरू
कोट
आदिवासी पाड्यात बँक मित्रांमार्फत वेतन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सभा ठेवण्यात आली आहे. सेमाडोह येथील प्रकाराबद्दल त्यांच्या वरिष्ठांना कळविण्यात आले आहे.
- माया माने,
तहसीलदार चिखलदरा
--------------