आदिवासींची डोंगरदऱ्यांतून पाण्यासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:00 AM2020-05-30T05:00:00+5:302020-05-30T05:00:07+5:30
डोक्यावर सूर्य तळपत असताना, हंडा घेऊन जाणारी लहान मोठी मुले व महिला हे चित्र रोजचेच आहे. दरवर्षी मार्च महिना लागला की, एकझिरा येथील महिलांचा पाण्यासाठी जीवघेणा प्रवास सुरू होतो. या गावात पाणीपुरवठा योजनेसाठी चार वर्षांत दहा लाख रुपयांचा निधी आला. त्यातून गावात दोन बोअरवेल खोदण्यात आल्या. पाणी न लागल्याने पैसा वाया गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुरणी (चिखलदरा) : पावसाळा तोंडावर आला असताना, मेळघाटातील पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. चिखलदरा तालुक्यातील एकझिरा या ६५० लोकसंख्येच्या आदिवासीबहुल गावांतील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यांतून दीड किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.
डोक्यावर सूर्य तळपत असताना, हंडा घेऊन जाणारी लहान मोठी मुले व महिला हे चित्र रोजचेच आहे. दरवर्षी मार्च महिना लागला की, एकझिरा येथील महिलांचा पाण्यासाठी जीवघेणा प्रवास सुरू होतो. या गावात पाणीपुरवठा योजनेसाठी चार वर्षांत दहा लाख रुपयांचा निधी आला. त्यातून गावात दोन बोअरवेल खोदण्यात आल्या. पाणी न लागल्याने पैसा वाया गेला. उरलेल्या निधीत गावातील विहिरीचे खोलीकरण केले; पण काही फायदा झाला नाही. पहाटे ५ पासून या महिलांची पाण्यासाठी डोंगरदऱ्यांतून पायपीट सुरू असते. दीड किलोमीटरवरील ज्या ब्रिटिशकालीन विहिरीतून या आदिवासी महिला पाणी आणतात, त्या विहिरीत फक्त दोन फूट पाणी आणि तेही गढूळ असल्याने ्रग्रामआरोग्य धोक्यात आले आहे.
जनावरेही तहानलेली
मेळघाटातील भीषण पाणीटंचाईचा फटका हा फक्त इथल्या माणसांनाच बसतो असे नाही, तर जनावरांनादेखील पाणी पाजण्यासाठी डोंगरदºयांतून न्यावे लागते. विहिरीला फार पाणी नसल्याने आता गावात दर एक दिवसाआड पाण्याचा टँकर येतो. त्यालाही मुबलक पाणी नसते. महिलांची गर्दी होते. कुणाच्या भांड्यात पाणी मिळते, तर कुणाचे भांडे रिकामे. मग या महिलांचा पाण्यासाठीचा प्रवास पुन्हा सुरू होतो.