आदिवासींना लसीची भीती, केंद्रावर कोणी फिरकेना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 02:19 AM2021-05-08T02:19:53+5:302021-05-08T02:20:17+5:30
लसीकरणाबाबत अंधश्रद्धा पसरल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल महिन्यात लसींचे चारशे डोस आणण्यात आले होते.
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा (जि. अमरावती) : मेळघाटातील आदिवासी अंधश्रद्धेपोटी लसीकरण करून घेत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लस घेतल्याने मृत्यू होतो, अशा सांगोपांगी खोट्या माहितीवर विश्वास ठेऊन हे आदिवासी लस घेण्यास घाबरत आहेत. परिणामी, आदिवासींच्या लसीकरणाचा टक्का खूप कमी असून त्यांच्यासाठी आलेल्या लसी शेजारच्या जिल्ह्यातील नागरिक येऊन टोचून घेत आहेत. एकट्या चिखलदरा तालुक्यातील चार हजारपैकी आतापर्यंत फक्त १२०० स्थानिकांचे लसीकरण झाले असून त्यात निम्मे फ्रंटलाईन वर्कर आहेत. मेळघाटच्या बाहेरील सुमारे तीन हजार नागरिकांनी येऊन लसी टोचून घेतल्या.
लसीकरणाबाबत अंधश्रद्धा पसरल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल महिन्यात लसींचे चारशे डोस आणण्यात आले होते. आठ दिवस ठेवून नागरिकांना वारंवार विनवण्या केल्यावर केवळ सतरा जणांनी लस घेतली. त्यामध्येही आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांचा सहभाग होता. उर्वरित ३८० लसी परत गेल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी महेश कुर्तकोटी यांनी दिली.
अंगणवाडी, आशा वर्कर आरोग्य कर्मचारी, पाड्यांवर रात्रीच्या वेळेला जाऊन लोकांचे मन वळवत आहेत.