आदिवासींना ८५ टक्के अनुदानावर मिळणार विविध साहित्य
By गणेश वासनिक | Published: November 20, 2023 06:14 PM2023-11-20T18:14:42+5:302023-11-20T18:16:34+5:30
योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले, १५ डिसेंबरपर्यंत डेडलाईन.
अमरावती : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी कार्यक्षेत्रातील केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन २०२३-२०२४ अंतर्गत मंजूर विविध योजनाचा लाभ घेण्याकरीता अनूसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन यांनी केले आहे.
आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना तुषार सिंचन ८५ टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर काटेरीतार लोखंडी ऐंगलसह खरेदी करण्यासाठी अर्थ सहाय्य, आदिवासी वनपट्टे धारकांना शेती अवजारे खरेदी करीता ८५ टक्के अनुदानावर अर्थसहाय्य, आदिवासी वनपट्टे धारकांना शेळी गट खरेदीकरीता ८५ टक्के अनुदानावर अर्थसहाय, आदिवासी बांधवांना कुकूटपालनाकरीता ८५ टक्के अनुदानावर अर्थसहाय्य व आदिवासी युवतींना ८५ टक्के अनुदानावर शिलाई मशिन खरेदीकरीता अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर तालुक्यातील लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी जि. अमरावती या ठिकाणी व नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांनी अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती येथे तसेच मोर्शी, वरूड तिवसा व चांदुर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत उपकार्यालय मोर्शी येथे अर्ज उपलब्ध असून अधिक माहितीसाठी या कार्यालयातील विकास शाखेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
अर्जाची यादी संगणकीकृत करणार- प्राप्त झालेल्या अर्जाच्या जेष्ठतेनुसार संगणीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करून पात्र, अपात्र अर्जदाराच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येईल. लाभार्थी निवड करताना प्रथम दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, अपंग, विधवा, परितक्त्य, निराधार महिला यांना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येईल. पात्र अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.