आदिवासींचे जत्थे मेळघाटात परतू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 10:21 PM2018-02-27T22:21:01+5:302018-02-27T22:21:01+5:30

The tribes of Adivasi started returning to Melghat | आदिवासींचे जत्थे मेळघाटात परतू लागले

आदिवासींचे जत्थे मेळघाटात परतू लागले

Next
ठळक मुद्देफागून आयो रे : शहरात रोजगारासाठी झाले होते स्थलांतरित

आॅनलाईन लोकमत
परतवाडा : रोजगाराच्या शोधात चार महिन्यांपूर्वी शहरी भागात स्थलांतरित झालेले आदिवासी त्यांच्या सर्वात मोठ्या होळी सणासाठी गावी परतू लागले आहेत. परतवाडा विश्रामगृहावर आदिवासींचे जत्थे आले असून, येथूनच ते आपल्या डोंगरकपारीत लपलेल्या स्वर्गात, नागमोडी वाटेने जात आहेत.
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा या तालुक्यांतील हजारो आदिवासी दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतरित होतात. मुलाबाळांसह नोव्हेंबर महिन्यापासून विविध कामांच्या शोधात नागपूर, अमरावती, अकोला, नांदेड, बुलडाणा, भोपाळ, इंदूर, खंडवा, जळगाव अहमदनगर, पुणे या बड्या शहरांत रस्त्याच्या डांबरीकरणासह मिळेल ती कामे करतात. दोन महिन्यांपूर्वी तूर, हरभरा कापणीसाठीसुद्धा आदिवासी स्थलांतरित झाले होते. होळी सणासाठी मिळेल ती कामे कामे त्यांनी केली.
परतवाड्यातून खरेदी
मेळघाटातील आपल्या गावी परतणाºया आदिवासींनी परतवाडा शहरातील चिखलदरा स्टॉप स्थित विश्रामगृह परिसरात त्यांनी आपले बस्तान मांडले आहे. परतवाड्याच्या बाजारपेठेतून आबालवृद्धांसाठी नवीन कपडे, किराणा व होळी सणासाठी आवश्यक साहित्य ते खरेदी करीत आहेत. या सणासाठी ते वर्षभर राबून पै-पै गोळा करतात, हे विशेष.
युवकांतर्फे खिचडी
परतवाडा शहरातील बारलिंगे कॉम्प्लेक्स मित्र मंडळाच्यावतीने गौरव कान्हेरकर, प्रशांत कान्हेरकर, देवेंद्र अर्डक, नितेश किल्लेदार, अंकुश इंगळे, मनोज पोटे, राजेश डांगे हे आदिवासींना दोन दिवसापासून खिचडी वाटप करीत आहेत. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
बँकांपुढे लागल्या रांगा
मेळघाटात नरेगाअंतर्गत काम आदिवासींना त्यांचे वेतन बँकांतून मिळत आहे. बँकांची संख्या कमी असल्याने सकाळी ९ ते रात्री ८ दरम्यान आदिवासींच्या बँकांपुढे रक्कम काढण्यासाठी रांगा लागत आहेत. बँक शाखांची संख्या वाढविण्याची मागणी राष्ट्रवादीचे संभूजी खडके यांनी केली आहे.

Web Title: The tribes of Adivasi started returning to Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.