समाजकल्याणच्या कनिष्ठ लिपिकाला मागितली खंडणी
By admin | Published: December 27, 2015 12:30 AM2015-12-27T00:30:08+5:302015-12-27T00:30:08+5:30
समाजकल्याण विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रबुध्द नगरातील रहिवासी नीलेश मेश्राम याच्याविरुध्द शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदविला आहे.
खळबळ : नीलेश मेश्रामविरुध्द तिसऱ्यांदा गुन्हा दाखल
अमरावती : समाजकल्याण विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रबुध्द नगरातील रहिवासी नीलेश मेश्राम याच्याविरुध्द शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदविला आहे. नीलेश मेश्रामवर महिनाभरात तीन खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रानुसार, समाज कल्याण विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असणारे विनोद एकनाथ जामनेकर (४६, रा. महादेव खोरी) यांच्याकडे कन्यादान योजना, मोटार वाहन योजना व मागासवर्गीय गृहनिर्माण योजना अशा विविध कामाची जबाबदारी आहे. या कामासंदर्भात प्रबुध्द नगरातील रहिवासी नीलेश मेश्राम याने माहिती अधिकारात अर्ज करून काही माहिती मागविली होती. त्यानंतर विनोद जामनेकर व त्यांच्या दोन सहकारी कर्मचाऱ्यांना पैशासाठी त्रास देणे सुरू केले होते. त्यानंतर काही दिवसांत नीलेशने विनोद जामनेकरविरुध्द एक खोटी पोलीस तक्रारसुध्दा दिली. हे प्रकरण दडपण्यासाठी त्याने विनोद जामनेकरला १ लाखांची मागणी केली होती. त्यावेळी विनोदनी त्याला भीतीपोटी १५ हजार रुपये दिले. त्यांना खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी नीलेशने दिली होती. यासंदर्भात चर्चेकरिता त्याने ८ डिसेंबरला विनोदला महादेव खोरी येथील पुलावर बोलाविले होते. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. नीलेशच्या त्रासामुळे अखेर विनोद यांनी फे्रजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी निलेश मेश्रामविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)