राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ५३ वा पुण्यतिथी महोत्सव; गुरुदेवभक्तांची मौन श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 10:25 AM2021-10-26T10:25:47+5:302021-10-26T10:32:57+5:30

गुरुकुंज आश्रम (ता. तिवसा) येथील प्रार्थना मंदिराजवळ गुरुदेवभक्त व साधकांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी ४.५८ वाजता गुरुमाउलीला मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

tribute to rashtrasant tukadoji maharaj by devotees on his 53rd death anniversary | राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ५३ वा पुण्यतिथी महोत्सव; गुरुदेवभक्तांची मौन श्रद्धांजली

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ५३ वा पुण्यतिथी महोत्सव; गुरुदेवभक्तांची मौन श्रद्धांजली

Next
ठळक मुद्देमानवता व सर्वसंत स्मृतिदिन, सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना

अमित कांडलकर 

अमरावती : खंजिरी भजनांच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे, विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे युगपुरुष वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५३ व्या पुण्यतिथी महोत्सवनिमित्त कोविड नियमांच्या अधीन राहून गुरुकुंज आश्रम (ता. तिवसा) येथील प्रार्थना मंदिराजवळ गुरुदेवभक्त व साधकांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी ४.५८ वाजता गुरुमाउलीला मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण ११ ऑक्टोबर १९६८ रोजी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी झाले होते. तेव्हापासून राष्ट्रसंतांना त्यांच्या विचारांचे सर्वधर्म पंथातील भक्त व साधक या दिवशी श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे अश्विन वद्य पंचमीला एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण करतात.

कोविड नियमांमुळे राज्यभरातील लाखो भाविकांचा मेळा यंदा गुरुकुंजात नव्हता. मौन श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमाला दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी ‘गुरुदेव हमारा प्यारा है जीवन का उजियारा’ या प्रार्थनागीताने सुरुवात करण्यात आली. राष्ट्रसंतांच्या जीवनकार्याचे स्मरण करण्याची, त्यातून प्रेरणा घेण्याची आणि काही संकल्प करण्याची ही वेळ असते. त्यामुळेच याप्रसंगी राष्ट्रसंतांच्या भव्यदिव्य विश्वव्यापक कार्याची माहिती शब्द व सुरांच्या माध्यमातून आभासी पद्धतीने महेश तिवारी यांच्याकडून करून दिली गेली. ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी शिस्तबद्धरितीने गुरुदेव भक्तांनी, साधकांनी महासमाधी स्थळाच्या दिशेने दोन्ही हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली.

श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात 'भारत से लढनेवाले हो। ईश्वर से जरा तो डरो।', 'महल अटारी किस की बांधी। सब चाहते है दाम, अंतकाल में नंगा जाना साथमें न आये छदाम,' आदी भजने सादर करण्यात आली. तसेच 'चलाना हमें नाम गुरू का चलाना।' व ‘राष्ट्रसंता जगत् गुरु कृपावंता’ ही सामूहिक आरती करण्यात आली. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी या सर्व धर्मांच्या प्रार्थना त्यांच्या धर्मगुरूंकडून म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश यावेळी देण्यात आला. याप्रसंगी भारतीय लष्करातील शहीद झालेल्या जवांनाना श्रद्धांजली वाहण्यात आली.

शिस्तबद्ध सोहळा

अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने साधेपणाने व छोटेखानी श्रद्धांजलीचा सोहळा यावेळी घेण्यात आला. धार्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील काही मोजके गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. श्रद्धांजली कार्यक्रमाचे नियोजन आध्यात्म विभागाचे प्रमुख डॉ. राजाराम बोथे यांनी केले. या कार्यक्रमाकरिता पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार बंटी भांगडिया, अ. भा. श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या संचालक मंडळाच्या उपाध्यक्ष पुष्पा बोंडे, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, प्रचारप्रमुख दामोदर पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे, डॉ. उद्धवराव गाडेकर, आचार्य हरिभाऊ वेरूळकर, विखे गुरुजी, लक्ष्मणदास काळे, ॲड. दिलीप कोहळे, गुलाब खवसे, विलास साबळे, जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख, निवेदिता दिघडे, राजेश वानखडे, पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, संजय देशमुख, डॉ. रघुनाथ वाडेकर, डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल, भानुदास कराळे, मनीष जयस्वाल, जीवन व आजीवन प्रचारक तथा गुरुदेवभक्तांची लक्षणीय उपस्थिती होती.

Web Title: tribute to rashtrasant tukadoji maharaj by devotees on his 53rd death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.