राष्ट्रसंतांना साश्रृनयनांनी मौन श्रद्धांजली, लाखो गुरूदेव भक्तांची मांदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 07:47 PM2017-10-10T19:47:53+5:302017-10-10T19:52:57+5:30
अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून अखिल विश्व सुखी समृद्ध करण्याचा ‘ग्रामगीता’ रुपी महामंत्र देणा-या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना कानाकोप-यातून गुरुकुंजात आलेल्या लाखो गुरुदेवभक्तांनी मंगळवारी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी भावपूर्ण ‘मौन श्रद्धांजली’ अर्पण केली.
गुरुकुंज मोझरी : अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून अखिल विश्व सुखी समृद्ध करण्याचा ‘ग्रामगीता’ रुपी महामंत्र देणा-या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना कानाकोप-यातून गुरुकुंजात आलेल्या लाखो गुरुदेवभक्तांनी मंगळवारी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी भावपूर्ण ‘मौन श्रद्धांजली’ अर्पण केली.
पूजापाठाचे कुठलेही अवडंबर न करता केवळ मौन पाळल्यामुळे गुरूकुंजात नीरव शांतता पसरली होती. २४ तास अविरत वाहणा-या राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची चाकेही यावेळी थांबली.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण अश्विन वद्य पंचमी शुक्रवार ११ आॅक्टोबर १९६८ रोजी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी झाले होते. तेव्हापासून दरवर्षी अविरतपणे गुरुकुंजात हा भावविभोर सोहळा आयोजित केला जात आहे.
‘मौन श्रद्धांजली’च्या मुख्य कार्यक्रमाला ३.३० वाजता सुरुवात झाली. ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी शिस्तबद्धरितीने तमाम गुरूदेवभक्तांनी महासमाधीच्या दिशेने हात जोडून श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर आरती व सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. मौन श्रद्धांजलीसाठी देशभरातून भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाने या कार्यक्रमासाठी विशेष तयारी केली होती. तालुका, स्थानिक व पोलीस प्रशासनानेदेखील तगडा बंदोबस्त लावला होता. भक्तांच्या वाहनांसाठी विशेष सोय करण्यात आली .
यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव मंडळाचे अध्यक्ष डॉ.एस.एन.सुब्बाराव, सरचिटणीस जनार्दन बोथे, पुष्पा बोंडे, निवेदिता चौधरी, गौरी देशमुख यांच्यासह मंडळाचे सर्व संचालक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संचालन महेश तिवारी यांनी केले. प्रार्थना गायन जया सोनारे, गोपाल सलोडकर, किशोर जगडे, शीतल मांडगवडे यांनी केले. त्यांना वादक रामेश्वर काळे यांनी साथ दिली.