ट्रक-दुचाकीत धडक; १२ वर्षीय मुलगा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:27 PM2017-10-31T23:27:49+5:302017-10-31T23:28:06+5:30
यवतमाळ टी-पॉइंटवर झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीवरील १२ वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : यवतमाळ टी-पॉइंटवर झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीवरील १२ वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी ११ वाजता हा अपघात घडला.
सोहन प्रवीण तुरक (१२) असे मृत मुलाचे व प्रवीण जानराव तुरक (३७, दोघेही रा. वीरगव्हाण, जि. वाशीम) असे गंभीर जखमी वडिलाचे नाव आहे. एमएच ०४ एफपी ४४०६ क्रमांकाचा ट्रक टी-पॉइंटवर वळण घेत असताना त्यांची एमएच ३७ आर १४६१ क्रमांकाची दुचाकी या ट्रकला भिडली.
या दुचाकीने प्रवीण, सोहन व त्याची आई अमरावतीहून गावाकडे लोणीमार्गे परत जाण्यासाठी निघाले होते. अपघातास कारणीभूत ट्रक मुंबईहून नांदगाव खंडेश्वर येथे माल भरण्यासाठी चालला होता. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. मात्र, काही मदत मिळण्यापूर्वीच चिमुकल्या सोहनचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक मोहम्मद हजीम खान (५०, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक संजय आत्राम अधिक तपास करीत आहेत.
यवतमाळ टी-पॉइंट ते बडनेरा पोलिस ठाण्यापर्यंतचा रस्ता अत्यंत वर्दळीचा झाल्याने अपघातप्रवण स्थळ झाले आहे. या मार्गावर यापूर्वी एक मुलगा मालधक्क्यावरील ट्रकखाली चेंगरून मृत्यू झाला होता. त्यानंतर वाहतूक पोलीस नेमण्यात आले. तथापि, वाहतूक सारखी खोळंबून असल्याने अपघातांचे प्रमाण सारखेच आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करावा अशी मागणी अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा करण्यात आली असून चिमुकल्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केल्या जात आहे.