५४ जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:54 PM2017-08-20T23:54:50+5:302017-08-20T23:58:09+5:30
भोपाळहून अमरावतीकडे चांदूररेल्वेमार्गे ५४ जनावरे घेऊन जाणाºया ट्रकसह आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. यातील सात जानावरे मृतावस्थेत आढळून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूररेल्वे : भोपाळहून अमरावतीकडे चांदूररेल्वेमार्गे ५४ जनावरे घेऊन जाणाºया ट्रकसह आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. यातील सात जानावरे मृतावस्थेत आढळून आली. ही कारवाई नागपूर शहर आरटीओच्या अधिकाºयांनी चांदूररेल्वे शहरानजीक चांदूरवाडी येथे केली.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर आरटीओ पथकाची विशेष मोहीम अमरावती जिल्ह्यात सुरू आहे. हे पथक शनिवारी चांदूररेल्वे शहरात होते. अशातच चांदूररेल्वे शहरापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या चांदूरवाडीजवळ जनावरांना घेऊन जाणारा एमपी ०९ एडी ६४२७ क्रमांकाच्या ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न आरटीओ पथकाने केला. मात्र हा ट्रक थांबला नाही आणि वेगाने चांदूररेल्वे शहरातून पळ काढत असताना चालकाने शहरातील पात्रीकर कॉलनीजवळ थांबविला व पळ काढला.
आरोपी चालक अफसर कुरेशी (वय ३०) याचा पाठलाग करून आरटीओ पथकाने अटक केली. परंतु ट्रकचा क्लिनर पसार झाला. जनावरांना चांदूरवाडी येथील नागमंदिरात सोडण्यात आले. ही कारवाई नागपूर आरटीओचे अधिकारी नितीन उके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. पुढील तपास चांदूररेल्वे पोलीस करीत आहे.