ये पैसे मेरे नही है..! धारणीतील ट्रकचालकाचा प्रामाणिकपणा, परत केले १४ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 03:13 PM2021-11-22T15:13:07+5:302021-11-22T15:21:08+5:30
मोहम्मद फिरोज अब्दुल अजीज या ट्रकचालकाच्या खात्यात दहा दिवसांपूर्वी १४ लाख रुपये जमा झाले होते. मात्र, त्यांनी एक रुपयाही न काढता, बँकेत याबाबत माहिती दिली. बँकेत बोलावल्यावर पैसे परत करण्याच्या प्रक्रियेत पूर्ण सहकार्य केले.
अमरावती : आजकाल पैशांसाठी कोण कोणाशी वाकडं करेल काही सांगता येत नाही. मात्र, काही लोक याला अपवाद ठरतात. धारणीत असाच एक प्रसंग समोर आला असून चुकून बँक खात्यात आलेले लाखो रुपये त्यांनी परत केले आहेत.
दहा दिवसांपूर्वी बँकेच्या खात्यात जमा झालेले १४ लाख रुपये माझे नाहीत, असे म्हणत धारणीतील ट्रकचालकाने सर्वांचे लक्ष वेधले. धारणी येथील बँकेत हा प्रकार घडला. त्याच्या प्रामाणिकतेमुळे मूळ मालकाला ही रक्कम परत करता आली.
प्राप्त माहितीनुसार, मोहम्मद फिरोज अब्दुल अजीज असे या ट्रकचालकाचे नाव आहे. शहरातील स्टेट बँकेत रोजच्या प्रमाणे गर्दी जमलेली असताना तो हातात पासबुक आणि मोबाइल घेऊन आतमध्ये शिरतो. भिरभिर नजरेने गर्दीतून वाट काढत तो कसाबसा टेबलजवळ आला. अडखळत्या शब्दांमध्ये त्यांनी मोबाइलमधील मेसेज दाखवले. माझ्या खात्यात १४ लाख रुपये जमा झाले आहेत; पण, ते कुणी केले, हे मला माहिती नाही. हे पैसे माझे नाहीत, हे नक्की, असे म्हणताच सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.
दहा दिवसांपूर्वी खात्यावर पैसे जमा होऊनही त्यांनी एक रुपयाही काढला नव्हता. याउलट बँकेत बोलावल्यावर पैसे परत करण्याच्या प्रक्रियेत पूर्ण सहकार्य केले. आयसीआयसीआय बँकेच्या अंधेरी शाखेकडून ई-मेल आल्यानंतर हे पैसे शनिवारी आरटीजीएसने परत करण्यात आले. याबद्दल बँकेचे व्यवस्थापक शशांक गजभिये व मिलिंद नेरकर यांनी त्यांचे आभार मानले.