दहाचाकी ट्रक उलटला कुंपणभिंतीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:21 AM2019-05-08T01:21:50+5:302019-05-08T01:22:16+5:30
रेतीने भरलेला दहाचाकी ट्रक उलटून घराची कुंपणभिंत कोसळल्याने मंगळवारी सकाळी स्वस्तिकनगरात खळबळ उडाली. तो ट्रक ज्या घराच्या भिंतीवर उलटला, ते घर सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त पी.टी. पाटील यांच्या मालकीचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेतीने भरलेला दहाचाकी ट्रक उलटून घराची कुंपणभिंत कोसळल्याने मंगळवारी सकाळी स्वस्तिकनगरात खळबळ उडाली. तो ट्रक ज्या घराच्या भिंतीवर उलटला, ते घर सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त पी.टी. पाटील यांच्या मालकीचे आहे. घटनेनंतर ट्रकचालक व क्लीनर हे दोघेही पसार झाले. या घटनेची तक्रार राजापेठ पोलिसांत करण्यात आली.
सितारामनगरात बांधकामस्थळी ट्रक (एमएच २७ एक्स ६९५६) स्वस्तिकनगर मार्गाने जात होता. यादरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्यालगतचा मातीचा भराव ट्रकच्या भाराने खचला आणि एका बाजूने पूर्णपणे झुकलेला ट्रक पी.टी.पाटील यांच्या घराच्या आवारातील कुंपणभिंतीवर उलटला. ट्रक उलटल्याने व कुंपणभिंत पडल्याने मोठा आवाज झाला. तेथील रहिवासी अॅड. डी.बी. देशमुख यांच्यासह अन्य नागरिक घराबाहेर आले. यादरम्यान चालक व क्लीनरने ट्रकबाहेर येऊन पळ काढला. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी पी.टी. पाटील यांच्या तक्रारीवरून चालकाविरुद्ध भादंविच्या कलम ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला.
दरम्यान, सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम झाल्यानंतर पाणीगळतीच्या दुरुस्तीसाठी मजीप्राच्या कंत्राटदाराने रस्त्यालगत खड्डा खोदला होता. तो व्यवस्थित न बुजविल्याने जमिनीच्या आतील भाग पोकळ राहिला. त्यामुळे ट्रक उलटल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
नो-एन्ट्रीत शिरले जड वाहन
शहरात जड वाहनांना सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश नाही. नो-एन्ट्रीचे उल्लंघन करून ट्रक शहरात शिरला. त्यातच रहिवासी क्षेत्रातील अरुंद गल्लीतून बांधकामस्थळी जात होता. यादरम्यान हा अपघात घडला.
सकाळी १० ते रात्री १० पर्यंत शहरात जड वाहनांना नो-एन्ट्री आहे. रहिवासी परिसरात शिरलेल्या त्या ट्रकसंदर्भात संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- रणजित देसाई
सहायक पोलीस आयुक्त,