जिल्हा परिषदेत बदल्यांचा बिगूल वाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:11 AM2021-07-17T04:11:39+5:302021-07-17T04:11:39+5:30
अमरावती : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ टक्के बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिल्यानंतर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची ...
अमरावती : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ टक्के बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिल्यानंतर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत १० टक्के प्रशासकीय आणि ५ टक्के विनंती बदल्या ३१ जुलैपर्यंत व त्यानंतर १० टक्के विशेष बदल्या आयुक्तांच्या मान्यतेने १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. शासन आदेशानुसार जिल्हा परिषद सीईओंनी झेडपीच्या गट ‘क‘ आणि गट ‘ड‘च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी १५ जुलै रोजी प्रशासकीय कामकाजाची कार्यसूची जाहीर केली आहे. त्यामुळे मिनीमंत्रालयात बदलीची धूम राहणार आहे.
दरवर्षी जून पूर्वी बदल्यांची प्रक्रिया पार पडते. मात्र, यावर्षी कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने काही अपवाद वगळता इतर सर्व प्रकारचे बदल्यांना ३० जूनपर्यंत स्थगिती दिली होती. त्यामुळे गत वर्षीप्रमाणे यंदाही बदल्या होणार नाहीत, असा अंदाज असताना सामान्य प्रशासन विभागाने बदलांबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे ग्रामविकास विभागाने १५ टक्के सामान्य बदल्यांची परवानगी जिल्हा परिषदेला दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागाने बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १६ ते २२ जुलै पर्यंत बदली प्रक्रियेसाठीची आवश्यक कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर २६ जुलैपासून प्रत्यक्ष बदली प्रक्रियेचे समुपदेश होणार असल्याची माहिती आहे.
बॉक्स
बदली प्रक्रियेची कार्यसूची जाहीर
जिल्हा परिषद कर्मचारी बदलीप्रक्रियेसाठी संवर्गनिहाय अंतरिम एकत्रित वास्तव्य सेवाज्येष्ठता यादी तयार करून प्रसिध्द करणे १६ जुलै, विनंती अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १९ जुलै, अंतिम वास्तव्य सेवाज्येष्ठता यादीवर आक्षेप व सूचना मागविणे २० जुलै, आक्षेप व सूचनांचे निराकरण करून अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे २२ जुलै याप्रमाणे बदली प्रक्रियेची कार्यसूची सीईओंनी जाहीर केली आहे.
बॉक्स
२६ ते २८ जुलै दरम्यान बदल्या?
जिल्हा परिषदेत वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्याची कारवाई सुरू केली आहे. १६ ते २२ जुलैपर्यंत बदल्यासंदर्भात प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे. यानंतर २६ ते २८ जुलैपर्यंत बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रत्यक्ष कार्यवाही समुपदेशनाव्दारे पार पडणार असल्याचे संकेत आहेत.