अमरावती, अचलपूरला ‘ट्रूनॅट’ मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 05:00 AM2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:01:17+5:30
‘लॅपटॉप’च्या आकाराची ही मशीन गरजेनुसार कुठेही हलविता येणार आहे. यातील कार्टेजवर संशयिताच्या स्वॅबची तपासणी केली जाईल. सुरुवातीला ही मशीन क्षयरुग्णांच्या चाचणीसाठी तयार करण्यात आली. मात्र, कोरोनाचे संक्रमित मोठ्या प्रमाणात निष्पन्न होत असल्याने या मशीनमध्ये थोडाफार बदल करून नव्याने विकसित करण्यात आली व आता कोरोनाच्या हायरिस्क असणाऱ्या रुग्णांच्या चाचणीसाठी वापरण्यात येणार आहे.
गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाचे संक्रमित रुग्ण त्वरेने निष्पन्न व्हावेत व त्यांच्यावर लगेच उपचार होऊन अन्य व्यक्ती संक्रमित होऊ नये, यासाठी जिल्ह्यात अमरावती व अचलपूरला प्रत्येकी एक ‘ट्रूनॅट’ मशीन उपलब्ध झाल्याची ‘गुड न्यूज’ आहे. या मशीनवर आता तासाभरात चाचणी होईल. या मशीनचा अहवाल पॉझिटिव्ह असल्यासच ‘त्या’ रुग्णाची ‘आरटी-पीसीआर’ तपासणी केली जाणार असल्याने विषाणू परीक्षण प्रयोगशाळेवरील ताण काहीसा कमी होणार आहे.
‘लॅपटॉप’च्या आकाराची ही मशीन गरजेनुसार कुठेही हलविता येणार आहे. यातील कार्टेजवर संशयिताच्या स्वॅबची तपासणी केली जाईल. सुरुवातीला ही मशीन क्षयरुग्णांच्या चाचणीसाठी तयार करण्यात आली. मात्र, कोरोनाचे संक्रमित मोठ्या प्रमाणात निष्पन्न होत असल्याने या मशीनमध्ये थोडाफार बदल करून नव्याने विकसित करण्यात आली व आता कोरोनाच्या हायरिस्क असणाऱ्या रुग्णांच्या चाचणीसाठी वापरण्यात येणार आहे. या मशीनमध्ये चाचणी पॉझिटिव्ह आल्यासच त्या व्यक्तीवर कोविड-१९ चे उपचार केले जाणार आहे. या मशीनवर ‘राऊंड दी क्लॉक’ एका दिवसात किमान २४ ते ४८ नमुन्यांची तपासणी होऊ शकते. यामुळे लॅबवरचा ताण कमी होण्यास मदत होईल. कोरोना संक्रमित त्वरेने निष्पन्न होतील, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनी दिली. ही एक ‘स्ट्रिमिंग टेस्ट’ आहे. सद्यस्थितीत कोरोना संशयित रुग्ण वाटल्यास त्या प्रत्येक व्यक्तीच्या घशातील स्त्रावाची तपासणी आरटी-पीसीआर पद्धतीने केली जाते. यानंतर ट्रूनाटमध्ये पॉझिटिव्ह आल्यासच थ्रोट स्वॅबची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी दिली. या मशीनला ‘आयसीएमआर’ ने मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यापासून आतापर्यंत ९२७८ नागरिकांची तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आलेली आहे. मंगळवारी १७४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. २११० संशयित व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापौकी आतापर्यंत १७१३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले, तर ८४ पॉझिटिव्ह व १९६ अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये १२ रुग्णांचा मृत्यू व ४५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी ६५ नमुने तपासणीसाठी पाठविले, तर रात्रीपर्यंत १३९ अहवाल प्राप्त झालेत, हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत.
‘ट्रूनॅट’वर निगेटिव्ह आल्यास ‘आरटी-पीसीआर’ नाही
जिल्ह्यास उपलब्ध होत असलेल्या दोन ट्रूनॅट मशीनवर संशयित व्यक्तीचा थ्रोट स्वॅब चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यास त्या व्यक्तीच्या घशातील स्रावाचा नमुना विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत पाठवून ‘आरटी-पीसीआर’ करण्याची आवश्यकता राहणार नाही. मात्र, चाचणी पॉझिटिव्ह आल्यासच पुन्हा लॅबद्वारे तपासणी केली जाणार आहे. यामध्ये नमुना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास ‘त्या’ रुग्णावर कोविड -१९ चा उपचार केला जाईल. यामुळे लॅबवरचा ताण कमी होऊन संक्रमित व्यक्ती लवकर निष्पन्न होणार आहे.
या ‘ट्रूनॅट’ मशीनद्वारे दिवसाला २४ ते ४८ या दरम्यान अहवाल प्राप्त होतील व यामध्ये अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीची पुन्हा थ्रोट स्वॅब तपासणी केली जाईल. चाचणी निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता राहणार नाही.
- डॉ विशाल काळे, एमओएच, महापालिका
ही एक स्ट्रिमिंग टेस्ट आहे. यासाठी दोन ‘ट्रूनॅट’ ’ मशीन जिल्ह्यास उपलब्ध होणार आहे. यापैकी एक अमरावतीला, तर दुसरी मशीन अचलपूर उपजिल्हा रुग्णालयास देण्यात येईल. याद्वारे संशयित नागरिकांच्या नमुन्यांची तपासणी केली जाईल.
-डॉ श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक