‘मनभरी’त तळलेली मुंगी, केसांचा गुच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 09:56 PM2017-09-07T21:56:26+5:302017-09-07T21:56:45+5:30
मनभरीच्या नानखटाईच्या पाकिटात तळलेली मुंगी तर जीरा टोस्टच्या पाकिटात चक्क केसांचा गुच्छ आढळला. ही घटना राजापेठ येथील ‘मनभरी फुडमार्ट शिल्पी कॉम्पलेक्स’ येथे गुरूवारी दुपारी २.५५ वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मनभरीच्या नानखटाईच्या पाकिटात तळलेली मुंगी तर जीरा टोस्टच्या पाकिटात चक्क केसांचा गुच्छ आढळला. ही घटना राजापेठ येथील ‘मनभरी फुडमार्ट शिल्पी कॉम्पलेक्स’ येथे गुरूवारी दुपारी २.५५ वाजता घडली. ग्राहकाने मनभरीच्या दोन्ही उत्पादनांचे सीलबंद पाकीट येथील अन्न व प्रशासन विभागाकडे नेऊन लेखी तक्रार नोंदविली.
रूख्मिणीनगर येथील मेघा निरज चेड या मनभरीच्या राजापेठ येथील फुडमार्टमध्ये गेल्या होत्या. येथून त्यांनी २०० रूपयांचे खाद्यपदार्थ खरेदी केले. मनभरीची गोड नानखटाई व मनभरी जीरा टोस्ट खरेदी केले व त्या घरी आल्या. लहान मुलांना जीरा टोस्ट व नामकटाई देत असताना त्यांना तळलेली मुंगी व केसांचा गुच्छ आढळून आला. त्यानंतर त्यांचे पती नीरज चेडे यांनी ही बाब सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र येते, गौतम देशपांडे, रामभाऊ भायदे यांना सांगितली. त्यांना सोबत घेऊन नीरज चेडे हे सायंकाळी ६ वाजता एफडीएचे कार्यालय गाठले. अन्न व प्रशासन विभागाचे सहआयुक्त अन्नपुरे यांना घडलेला प्रकार सांगितला. खरेदी केलेल्या मनभरीच्या खाद्यपदार्थांचे बिल देखील दाखविले.
कारवाईकडे लक्ष
अमरावती : एफडीएच्या अधिकाºयांनी मेघा चेडे यांना लेखी तक्रार देण्याचा सल्ला दिला. तक्रारीनंतर त्यांनी मनभरीच्या टोस्टचे आणि नानकटाईचे पाकिट जप्त केले. या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. यावेळी अन्न व सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे उपस्थित होते. याप्रकाराबाबत एफडीएच्या अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.