विजयच्या पत्रातून उघड होणार सत्य
By admin | Published: April 5, 2017 12:05 AM2017-04-05T00:05:55+5:302017-04-05T00:05:55+5:30
जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या विरुळपूर्णा येथील विजय नांदणे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेला १२ दिवस झाले आहेत.
विद्यार्थी आत्महत्या प्रकरण : दोषींवर कारवाईची मागणी
सुमित हरकुट चांदूरबाजार
जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या विरुळपूर्णा येथील विजय नांदणे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेला १२ दिवस झाले आहेत. मात्र अद्याप या घटनेतील सत्य अद्याप उघड व्हायचे आहे. याप्रकरणी शाळेतील मुख्याध्यापक अमोल माकोडे व वर्गशिक्षक शिंगणे यांची दररोज चौकशीसाठी ठाण्यात बोलावले जात आहे. मृत्यूपूर्व विजयने लिहिलेल्या पत्रातील अक्षराचा तपासणी अहवाल मिळाल्यानंतरच या घटनेतील सत्य समोर येणार आहे. तर मृत विजय नांदणे व त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळायलाच हवा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यातील विरुळपूर्णा या गावात इयत्ता नववीतील १५ वर्षीय विद्यार्थी विजय नांदणे याने येथील एका शेतशिवारात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २४ मार्च रोजी उघडकीस आली होती. विजय जवळ मृत्यूपूर्व लिहिलेले एक पत्र आढळून आले होते. वर्गातील चार विद्यार्थी त्याला चिडवीत होते, तर शिक्षक मारहाण करीत असल्याने कंटाळून विजयने आत्महत्या केल्याची तक्रार त्याचे वडील सुधाकर नांदणे यांनी आसेगाव पोलिसांत केली होती.
या प्रकरणासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्चला मृत विजयच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांनी चिडविले होते. याची तक्रार त्याने वर्गशिक्षक शिंगणे व मुख्याध्यापक अमोल माकोडे यांच्याकडे केली होती. यावर वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांनी चिडविणाऱ्या चारही विद्यार्थ्यांसह मृत विजयला कानशिलात लगावत शिक्षा केली होती. याची माहिती विजयने आईला दिली होती. त्याच्या आईने वर्गशिक्षकांची भेट घेऊन या प्रकारची विचारणा केली होती. दुसऱ्या दिवशी विजय नेहमीप्रमाणे शाळेत गेला. मात्र मधल्या सुटीनंतर तो घरी परत आला व एका शेतात जाऊन त्याने विष प्राशन केले. आत्महत्या केल्याच्या दिवशी विजयला मारले नव्हेत, असा बयाण शाळेच्या शिक्षकांनी दिला आहे. मात्र असे काय घडले की, यामुळे विजयला आत्महत्या करावी लागली याचा अद्याप पत्ता लागला नाही.
मृत विजय जवळ मिळालेले पत्रदेखील पोलिसांसाठी संशयास्पद आहे. विजयची अक्षरे व पत्रात लिहलेल्या अक्षरांमध्ये असलेले साम्य पडताळण्यासाठी हस्तलिखित तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे
२४ मार्चला आत्महत्येनंतर शामकांत बोबडे विद्यालय ४ दिवस बंद असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी चौकशी करण्यासंदर्भात निवेदन विजयच्या वडिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. घटनेचा तपास आसेगावचे पीआय अजय आखरे करीत आहे.
- तर आत्महत्या टळली असती
विजय नांदणे याच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली आहे. विजयच्या आत्महत्येची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करीत त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी गावाकऱ्यांनी केली आहे. दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांविषयी अनेक तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची योग्य समजूत घातली असती तर विजय आज जिवंत असता असेही मत गावातील अनेकांनी नोंदविले.
विजय नांदणे याच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. मृत्यूपूर्व त्याने लिहिलेल्या पत्रातील अक्षरे त्याचीच आहेत काय? याची तपासणी करण्यासाठी आम्ही पाठविली आहे. तपासणीचा अहवाल आल्यावर पुढील कार्यवाही करू.
- अजय आखरे,
पोलीस निरीक्षक, आसेगाव