बनावट कागदपत्रांच्या आधारे पीककर्ज उचलण्याचा प्रयत्न
By admin | Published: October 9, 2014 10:56 PM2014-10-09T22:56:06+5:302014-10-09T22:56:06+5:30
बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून पीक कर्जाची उचल करण्याचा प्रयत्न विचोरी येथील शेतकरी पिता-पुत्राने केला. परंतु ऐन प्रक्रियेदरम्यान बँक व्यवस्थापकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांची कर्ज
चांदूरबाजार : बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून पीक कर्जाची उचल करण्याचा प्रयत्न विचोरी येथील शेतकरी पिता-पुत्राने केला. परंतु ऐन प्रक्रियेदरम्यान बँक व्यवस्थापकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांची कर्ज प्रक्रिया थांबविण्यात आली. या प्रकरणाची शिरखेड पोलीस ठाण्यांत तक्रार करण्यात आली आहे. दामोधर फुलेराव हरबास (६२), देवेंद्र ऊर्फ पिंट्या दामोधर हरबास (३५) अशी शेतकरी पिता-पुत्रांची नावे आहेत.
हरबास यांचे मौजा नबीपूर येथे त्यांचे शेत आहे. या शेतीच्या वाढीव पीक कर्जासाठी त्यांनी रिध्दपूर येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत अर्ज केला. पीक कर्ज प्रक्रियेकरिता बँकेच्या पॅनेलवर असलेले अधिवक्ता मनमोहन भुतडा यांची नेमणूक करण्यात आली. बँकेने हरबास यांना वाढीव पीक कर्जाकरिता मनमोहन भुतडा यांच्याकडून सर्च रिपोर्ट आणायला सांगितला होता. त्यानुसार भुतडा यांनी एका सीलबंद पाकिटात ११ सप्टेंबर २०१४ रोजी शाखा व्यवस्थापकाच्या नावे सर्च रिपोर्ट दिला. परंतु दामोधर हरबास व देवेंद्र हरबास यांनी हा सीलबंद लिफाफा फोडून त्यातील कागदपत्रे बदलविली. या लेटरपॅडवर बनावट शिक्कादेखील मारला आणि खोटी सही करून ही कागदपत्रे बँक आॅफ महाराष्ट्रच्या रिध्दपूर शाखेत जमा केली. यासाठी त्यांनी महसूल विभागाचा जुना सातबाराही जोडला होता.
या कागदपत्रांच्या आधारे बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी दामोधर, देवेंद्र हरबास यांना वाढीव पीक कर्जाची देयके दिली. ती वठविण्याकरिता हरबास पिता-पूत्र चांदूरबाजार शाखेत पोहोचले. परंतु कागदपत्रांवर खोडतोड केलेली आढळल्याने त्यांनी तत्काळ मनमोहन भुतडा यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या फसवाफसवीचा खुलासा झाला. शाखा व्यवस्थापकाने पिता-पुत्रांना दिलेली देयके थांबविली व नवीन सातबारा आणण्यास सांगितले. सातबारा आणण्यास त्यांनी वारंवार टाळाटाळ केल्याने या पिता-पुत्राचा खोटारडेपणा उघडकीस आला.