मिरचीपूड डोळ्यात फेकून लूटण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:23 PM2018-10-01T22:23:23+5:302018-10-01T22:23:53+5:30
डोळ्यात मिरचीपूड फेकून एका इसमास लूटण्याचा प्रयत्न झाला. ही घटना रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास राजापेठ बसस्थानकाबाहेर घडली. नागरिकांनी एका आरोपीस चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले असून, दोन आरोपी पसार झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डोळ्यात मिरचीपूड फेकून एका इसमास लूटण्याचा प्रयत्न झाला. ही घटना रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास राजापेठ बसस्थानकाबाहेर घडली. नागरिकांनी एका आरोपीस चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले असून, दोन आरोपी पसार झाले आहेत.
पोलीस सूत्रानुसार, विकास किरण खोब्रागडे (२६,रा.पाटीपुरा, यवतमाळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. छांगाणीनगरातील रहिवासी विजय माधव पांगरे (५८) सागर सेल्स कंपनीत वसुली कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. रविवारी सकाळी ते यवतमाळ येथे वसुली कामाने गेले. तेथील व्यापाऱ्यांकडून वसूल केलेली ९५ हजार २०० रुपयांची रक्कम बॅगेत टाकली आणि ते तेथील बसस्थानकावरून सायंकाळी शिवशाही बसमध्ये अमरावती येण्याकरिता बसले. रात्री ८.३० वाजता शिवशाही राजापेठ बसस्थानकात पोहोचली. बॅग हाती घेऊन बसमधून उतरून बाहेर आले आणि मालक दीपक वसंतवाणी (रा.विलासनगर, सिंधी कॅम्प) यांची प्रतीक्षा करीत होते. दरम्यान त्यांच्या मागून एक व्यक्ती आला आणि काही न बोलता त्याने विजयच्या डोळ्यावर मिरचीपूड फेकली. त्या भामट्याने विजयच्या हातातील बॅग हिसकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी हातातील बॅग सोडली नाही. दोघांमध्ये चांगलीच झटापट सुरू असताना त्या व्यक्तीचे अन्य दोन साथीदार विजयजवळ आले. त्यापैकी एकाने चाकू दाखविताच विजय यांनी आरडाओरड सुरू केली. विजय यांचा आवाज ऐकून बसस्थानक परिसरातील काही नागरिक मदतीसाठी धावून गेले. नागरिक येत असल्याचे पाहून तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान नागरिकांच्या हाती विकास खोब्रागडे लागला, तर त्याचे अन्य दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले. घटनेच्या माहितीवरून पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विकास खोब्रागडेला ताब्यात घेतले. याप्रकरणात विजय पांगरेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी भादंविच्या कलम ३९३, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोकुल ठाकूर करीत आहे.
विकास खोब्रागडेचीही पोलिसांत तक्रार
बॅग हिसकण्यासाठी आलेल्या विकास खोब्रागडेला नागरिकांनी चोप देऊन राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. नागरिकांच्या मारहाणीत विकास जखमी झाला होता. त्यानेही पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. त्याच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.