बालमृत्यू ३५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी प्रयत्न करा - आरोग्य संचालक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 09:28 PM2018-06-24T21:28:06+5:302018-06-24T21:28:22+5:30
मेळघाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू गतवर्षापेक्षा ३५ टक्कांनी कमी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे व एकही मातामृत्यू होऊ न देण्याचे निर्देश राज्याचे आरोग्य संचालक संजीव कांबळे यांनी दिले
अमरावती - मेळघाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू गतवर्षापेक्षा ३५ टक्कांनी कमी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे व एकही मातामृत्यू होऊ न देण्याचे निर्देश राज्याचे आरोग्य संचालक संजीव कांबळे यांनी चिखलदरा येथे रविवारी मेळघाटातील डॉक्टरांच्या आढावा बैठकीत दिले. सोबतच आदिवासींसोबत समन्वय साधून उपायोजना करण्याच्या सूचना केल्या.
येत्या ४ जुलैपासून नागपुरात होणाºया पावसाळी अधिवेशनाचा धसका नेहमीप्रमाणे मुंबई मंत्रालयातील अधिकाºयांनी घेतल्याचे चित्र रविवारी मेळघाटात पाहायला मिळाले. आरोग्य विभागाच्या बैठकीला आलेल्या आरोग्य संचालकांनी नागपूरवरून मुंबईचे विमान गाठण्यासाठी दीड तासातच आपली उपस्थिती दर्शवून आणि मेळघाटातील एकाही गावाला भेटी न देता निघून जाण्यात धन्यता मानली. बैठकीला आरोग्य विभागाचे सहायक संचालक डिग्गीकर, उपसंचालक राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक आसोले, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, प्राचार्य दिलीप रणमाळेसह मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील भरारी पथक, आरोग्य केंद्राचे डॉक्टर, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे तसेच आदिवासींमध्ये जनजागृती करून त्यांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचेही आरोग्य संचालकांनी या बैठकीत सांगितले.
धारणी, चिखलदºयात पोषण, पुनर्वसन केंद्र
पावसाळ्याच्या दिवसात मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढते. अशातच धारणी आणि चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात पोषण व पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. संदर्भसेवा उपचारात हयगय न करता, एकत्र येऊन काम करा. गतवर्षीच्या तुलनेत ३५ टक्क््यांनी कुपोषणाने मृत्यूूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांना परिश्रम घेण्याचेही दिलीप कांबळे यांनी आदेश दिले.
एकाही आदिवासी पाड्याला भेट नाही
नागपुरातील पावसाळी अधिवेशनाचा धसका आरोग्य विभागानेसुद्धा घेतल्याचे रविवारच्या बैठकीत स्पष्टपणे जाणवत होते विरोधकांच्या हाती राज्यातील आदिवासी भागांच्या कुपोषण व इतर समस्या लागू नये, यासाठी राज्याचे आरोग्य संचालक मेळघाटात बैठकीला आले. त्यांनी मार्गातील धामणगाव गढी वगळता मेळघाटातील एकाही आरोग्य केंद्र वा उपकेंद्राला भेट दिली नाही. थेट चिखलदरा गाठून तास-दीड तास बैठकीला हजेरी लावली आणि विमान गाठण्यासाठी नागपूरला निघून गेले. यादरम्यान भरारी पथकातील डॉक्टरांनी आपल्या वेतनासह इतर समस्या त्यांना कळविल्या. मेळघाटातील डॉक्टरांच्या सात रिक्त जागा असण्याच्या मुद्द्यावर त्यांनी कुठले आदेश दिले, हे मात्र कळू शकले नाही. आरोग्य संचालकांनी मेळघाटातील दुर्गम, अतिदुर्गम भागात जाऊन प्रत्यक्ष आदिवासींसोबत आरोग्य विषयावर चर्चा करणे क्रमप्राप्त होते. मात्र, तसे झाले नाही.