नरबळी देण्याचा प्रयत्न; दोघांना सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 05:26 AM2019-05-28T05:26:00+5:302019-05-28T05:26:04+5:30
नरबळी प्रयत्नाप्रकरणी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत सोमवारी दोघांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
- गणेश देशमुख
अमरावती : पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज आश्रमात तीन वर्षांपूर्वी घडलेल्या नरबळी प्रयत्नाप्रकरणी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत सोमवारी दोघांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये शिक्षा ठोठावण्यात आलेले राज्यभरातील हे पहिलेच प्रकरण असल्याची माहिती पैरवी अधिकारी योगेंद्र लाड यांनी दिली. 'लोकमत'ने शोधपत्रकारितेच्या माध्यमातून हे प्रकरण उघडकीस आणले होते, हे येथे उल्लेखनीय.
काय आहे प्रकरण?
७ आॅगस्ट २०१६ रोजी धामणगाव तालुक्यातील पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज आश्रमात निवासी शाळेच्या इयत्ता पाचवीत शिकणारा प्रथमेश अवधूत सगणे हा ११ वर्षांचा विद्यार्थी गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला.
वैद्यकीय इलाजादरम्यान आश्रमातील व्यक्तींनी सदर घटना अपघात असल्याचे सांगून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. 'लोकमत'ने या प्रकरणाला वाचा फोडली. मंगरूळ दस्तगिर पोलिसांनी मामांच्या तक्रारीनुसार, भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, १२०(ब) आणि अनिष्ट व अघोरी प्रतिबंधक कायद्याच्या २ (१)(ख)(३) कलमान्वये गुन्हा नोंदविला. घटनाक्रमाच्या पुढील साखळीत सुरेंद्र रमेश मराठे (३०) आणि नीलेश जानराव उके (२२) या दोघांना पोलिसांनी अटक केली. हे दोघे आश्रमातील भोजनालयात आचारी होते.