दीक्षाच्या अंगावर फोडले होते ट्यूबलाईट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 01:41 AM2019-08-28T01:41:13+5:302019-08-28T01:42:13+5:30
दोन वर्षांपूर्वी शालीकरामने दीक्षाशी वाद घालून तिच्या अंगावर ट्यूब लाइट फोडले. तीच्या डाव्या हाताच्या त्वचेत खोलवर ट्यूबलाइटच्या टोकदार काचा शिरल्या होत्या. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनाही तिच्या शरीरातून काचा काढताना कौशल्य पणाला लावावे लागले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पत्नीला बेदम मारहाण करून अमानुषतेचे कळस गाठणाऱ्या शालीकरामने दोन वर्षांपूर्वी पत्नी दीक्षाच्या अंगावर ट्यूबलाईट फोडून तिला गंभीर दुखापत केली होती. लोणी हद्दीतील काजना-राजनात घडलेल्या या घटनेत पोलीस तक्रार झाली. महिला तक्रार निवारण कक्षात समुपदेशनानंतर शालीकराम व दीक्षा पुन्हा एकत्र आले. मात्र, २५ ऑगस्टला त्याने आपण क्रूर असल्याचेच पुन्हा दर्शविले.
शालीकराम रोडगे हा पत्नी दीक्षावर अनन्वित अत्याचार करीत आला आहे. तरीदेखील ती पतीची साथ देत होती. मुलांचा विचार करून पतीसोबत जीवनाचा गाडा खेचत होती. मात्र, पती शालीकरामने क्रौर्याची सीमा ओलांडली असल्याने ती आता न्यायाची प्रतीक्षा करीत आहे.
दोन वर्षांपूर्वी शालीकरामने दीक्षाशी वाद घालून तिच्या अंगावर ट्यूब लाइट फोडले. तीच्या डाव्या हाताच्या त्वचेत खोलवर ट्यूबलाइटच्या टोकदार काचा शिरल्या होत्या. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनाही तिच्या शरीरातून काचा काढताना कौशल्य पणाला लावावे लागले होते. या घटनेची तक्रार लोणी पोलिसांत करण्यात आली होती. त्यानंतर कौटुंबिक कलहाचे हे प्रकरण नांदगाव खंडेश्वर येथील महिला तक्रार निवारण कक्षात समुपदेशानासाठी गेले. शालीकरामला माफ करून दीक्षाने पुढील जीवनप्रवाह सुरू केला. मंगळवारी मुलीबाबत घडलेल्या या अनन्वित अत्याचाराचे कथन दीक्षाची आई ताराबाई डोंगरे व स्वत: दीक्षानेही ‘लोकमत’शी बोलताना केले.
शालीकराम पोलिसांच्या हाताबाहेरच
दीक्षाला तुत्याची काठी, जळते लाकूड, जाड केबलने अमानुष मारहाण करणारा पती शालीकराम अद्याप लोणी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. लोणी पोलिसांची दोन पथके शालीकरामच्या विविध ठिकाणी शोध घेत आहेत. मात्र, तो गुंगारा देत आहे. महिलाविषयक इतकी गंभीर घटना घडली असतानाही पोलीस आरोपीला अटक करू शकले नसल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
आरोपी शालीकराम रोडगेच्या शोधात पथके फिरत आहेत. मात्र, तो अद्याप हाती लागलेला नाही. लवकरच त्याला अटक करू.
- सुरेंद्र अहेरकर, पोलीस निरीक्षक, लोणी ठाणे.