‘मेरी जान तुझे कुछ नही होगा..,’ म्हणत इन्स्टावर ‘पोस्ट’!, एकतर्फी प्रेमातून धमकी
By प्रदीप भाकरे | Published: March 26, 2023 02:28 PM2023-03-26T14:28:05+5:302023-03-26T14:29:06+5:30
अल्पवयीन मुलीने गाठले पोलीस ठाणे
अमरावती: ‘मेरी जान तुझे कुछ नही होगा, क्योंकी इसमे तेरी गलती कुछ भी नही, मुझे माफ करा दो, यह आपके और मेरे फोटो और मॅसेज है, कुठल्याही परिस्थितीमध्ये मला न सोडणारी बायको, सगळ्या जास्त काळजी करणारी. माझ्याकडून सगळे विचार करणारी, आय लव यू’ अशी इन्स्टा स्टोरी टाकत एका अल्पवयीन मुुलीला आत्महत्येची धमकी देण्यात आली. आरोपीच्या त्या वागण्याने हतप्रभ झालेल्या त्या मुलीने अखेर ठाणे गाठून पोलिसांची मदत मागितली.
याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी २४ मार्च रोजी रात्री आरोपी प्रतिक खंडारे (रा. महेंद्र कॉलनी) याच्याविरूध्द विनयभंग, बदनामी, धमकी व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, सन २०२० मध्ये आरोपी व फिर्यादी मुलीची ओळख होऊन त्यांच्यात मैत्री झाली. दोघांनी सोबत काही छायाचित्रे देखील काढली. काही दिवसांनी आरोपी प्रतिकने तू माझ्याशी लग्न कर, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असे म्हणून प्रपोझ केले. मात्र वय व अन्य गोष्टी पाहता तिने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने न एैकल्याने तिने बोलणे बंद केले. त्यामुळे प्रतिकने ट्युशन ते घर असा तिचा पाठलाग सुरू केला. तो तिला अडवू देखील लागला. ही बाब तिने कुटुंबांला सांगितले असता, काही दिवस त्याने तिला त्रास दिला नाही.
रस्त्यात अडवून धमकी
दरम्यान, २२ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास ती अल्पवयीन मुलगी सुंदरलाल चौकातून टयुशन संपवून घरी जात असताना प्रतिकने तिची छेड काढली. माझ्याशिवाय अन्य कुणाशी बोलायचे नाही. तू जर माझ्याशी बोलली नाही, तर स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करेन, परंतु त्यापुर्वी तुला सुद्धा मारुन टाकेल, अशी धमकी दिली. त्यामुळे ती प्रचंड घाबरली.
आत्महत्या करीत असल्याचे व्हिडीओ
२४ मार्च रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास प्रतिक खंडारे याने मुलीच्या मोबाईलवर व्हाइस मॅसेज व काही व्हिडीओ टाकून आत्महत्या करत असल्याची बतावणी केली. त्याचवेळी प्रतिकने मुलीसोबतच फोटो इन्स्टाग्रामवर टाकून एक स्टोरी शेअर केल्याची माहिती मुलीला तिच्या मावसभावाने दिली. ती बदनामीकारक पोस्ट पाहताच त्या अल्पवयीन मुलीने शुक्रवारी उशिरा रात्री गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. तेथे महिला पोलिसांनी तिचे बयाण नोंदविले.