तुरीचे बंपर उत्पादन शेतकऱ्यांच्या मुळावर
By admin | Published: April 30, 2017 12:06 AM2017-04-30T00:06:25+5:302017-04-30T00:06:25+5:30
गतवर्षीच्या आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे...
व्यापाऱ्यांनी भाव पाडले : कमी भावामुळे उत्पादन खर्च निघणेही मुश्कील
अमरावती : गतवर्षीच्या आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे २५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील तुरीवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाला. यानंतरही उर्वरित क्षेत्रात तुरीचे अधिक उत्पादन झाले. मात्र हंगामापूर्वीच खुल्या बाजारात हमीपेक्षा कमी भाव असल्याने शेतकरी पुरता अडचणीत आला व उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे.
गतवर्षीच्या खरिपामध्ये जिल्ह्यात एक लाख ३४ हजार ४३९ हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झाली. मात्र आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. यामुळे काळ्या जमिनीत पाण्याचा निचरा न झाल्याने जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये तुरीवर मोठ्या प्रमाणावर ‘मर’ रोगाचे आक्रमण झाले व किमान २५ ते ३० हजार हेक्टर क्षेत्रामधील तूर नष्ट झाली. मात्र उर्वरित एक लाख हेक्टरमध्ये मात्र तुरीचे अधिक उत्पादन झाले.
हंगामापूर्वी कृषी विभागाने हेक्टरी ११ क्विंटल तुरीची उत्पादकता गृहित धरली होती. प्रत्यक्षात ११.५६ क्विंटल सरासरी उत्पादकता राहिल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. शासनानेदेखील उत्पादकतेनुसार नियोजन केले नाही. परिणामी, म्यानमार, सुदान आदी देशातून मोठ्या प्रमाणावर तूर आयात करण्यात आली व या तुरीवर कुठलेही आयात शुल्क नाही व या सर्व परिस्थितीची व्यापाऱ्यांनी संधी साधली. गेल्या आठ महिन्यांपूर्वी १२ हजार रूपये प्रतिक्विंटल असणाऱ्या तुरीचे भाव हंगामापूर्वीच ३ ते ४ हजार रूपयांवर आले. व्यापाऱ्यांनी देखील खुल्या बाजारात कमी दराने तुरीची खरेदी करून शासकीय खरेदी केंद्रावर विकली. (प्रतिनिधी)
अशी आहे तुरीची उत्पादकता
कृषी विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात १५.५५ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन झाले. प्रत्यक्षात मात्र यापेक्षा अधिक उत्पादन झाल्याची शेतकऱ्यांची माहिती आहे. अमरावती तालुक्यात १.१८ लक्ष क्विंटल, धारणी १.२० लक्ष, चिखलदरा १.१८ लक्ष, भातकुली १.१९ लक्ष, नांदगाव खंडेश्वर १.२० लक्ष, चांदूररेल्वे ८३.४५ हजार, तिवसा ७०.४४ हजार, मोर्शी १.५६ लक्ष, वरूड १.३३ लक्ष, दर्यापूर १.३८ लक्ष, अंजनगाव सुर्जी ८७.९३ हजार, अचलपूर १.२६ लक्ष, चांदूरबाजार १.३६ लक्ष व धामणगाव तालुक्यात १.०९ लक्ष क्विंटल उत्पादकता राहिली आहे.